२०६
देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करावयाच्या नाहीत, हे माझे धोरण
दिनांक १४ एप्रिल १९४७ रोजी माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त असंख्य अस्पृश्यांनी मोठ्या थाटात बाबासाहेबांचा सत्कार केला. त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब दलित वर्गाला उद्देशून म्हणाले,
अखिल भारतातील दलित जनतेला स्वतःच्या विकृत स्थितिची जाणीव झाल्यामुळे ती आता आपले जीवन परिपूर्णतेला नेण्याकरिता सुसंघटितरित्या ऊभी ठाकली असल्यामुळे तिच्या वाट्याला उज्वल भविष्यकाल खात्रीने येणार, ही परिस्थिती पाहून मला आनंदाचे भरते येते. मी त्या दिवशी व्हाईसरॉयला स्पष्ट शब्दात सांगितले, ” तुम्ही मला पाचारण केले नसते तर मी तुम्हाला भेटण्यास आलोच नसतो. इंग्रजांच्या मागे धावत फिरण्याची माझी मुळीच इच्छा नाही." दलित जनतेच्या सुखसंवर्धनाची जबाबदारी एकेकाळी इंग्रजांनी स्वत:वर घेतली होती. इंग्रज आपल्या शब्दाला जागतील व आपल्यावरील जबाबदारी पार पाडण्याकरिता पुढे पाऊल टाकतील, असे मला त्यावेळी वाटले होते. पण तसे घडले नाही. इंग्रज हिंदुस्थान सोडून जात आहेत, याची मला मुळीच पर्वा नाही. परंतु आपणास ज्या सवलती घटनेत हव्या होत्या त्याची काहीच तरतूद करण्याचा प्रयत्न न करता ते जात आहेत. त्यांचे हे वागणे योग्य आहे की नाही याचा त्यांनीच निवाडा करावा. अस्पृश्यांच्या हितसंरक्षणाची काही तरी तरतूद करण्याची आवश्यकता मी त्यांना शंभर वेळा प्रतिपादन केली. इंग्रजांनी ते काम करण्याचे नाकारले तरी सहा कोटी अस्पृश्यांचा भाग्यकाल उज्वल आहे याची मला खात्री आहे असे मी म्हणालो. मजूर सरकारने जरी न्याय्य हक्क दिले नाही तरी ६ कोंटी अस्पृश्य वर्ग कोणत्याही सहकार्याची वा शक्तीची पर्वा न करता जे पाहिजे आहे ते मिळविलच मिळविल, याची माझ्या मनात किंचितही शंका नाही.
जागृती व संघटना यांच्या अभावी आम्ही आतापर्यंत दुसऱ्याचे वर्चस्व सहन केले पण आता तो काळ राहिला नाही. आता आमच्यात नवशक्ती वास करीत आहे, हे हिंदुस्थानातील प्रत्येक इसम जाणून आहे व म्हणूनच काँग्रेस व लीग आमचे सहकार्य मिळविण्याचा आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. याचे एकच कारण म्हणजे आपली पोलादी संघटना. १९४८ जून मध्ये हिंदुस्थान सोडण्याच्या ब्रिटिशांच्या घोषणेमुळे आपला प्रश्न फारच बिकट होऊन बसला आहे, ही जाणीव होताच, तेव्हा काय होईल त्याची कल्पना करवत नाही. कदाचित् असेही होईल
अरुण : ९ जून १९४७.