१४-४-१९४७ देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करावयाच्या नाहीत, हे माझे धोरण - Page 107

देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात .. .. . . हे माझे धोरण ६९

घटना समितीत मी फक्त एकच एक आहे. कितीही थोर पुरुष असला व त्याच्यात असामान्य बुद्धी व वाद करण्याचे वा समर्थन करण्याचे अचाट सामर्थ्य कितीही असले तरी तो एकटा असल्यावर काय करणार, याची जाणीव तुम्ही आपल्या ध्यानात असू द्या. २११ सभासदांनी कोणत्याही गोष्टीची यथार्थता बौद्धिक वा वैचारिक कसोटी लावून ठरविण्याचे नाकारले व फक्त विरोधकाला हाणून पाडण्याचा कट रचला तर मी एकटा मनुष्य काय करणार ?

शेवटी सर्वांना सुबुद्धी आठवून या गोष्टीची जाणीव होईल व आपणास जे साध्य करावयाचे आहे, ते हस्तगत करता येईल, अशी मला आशा आहे, यासाठी आपणास फक्त संघटनेची गरज आहे. आपल्या अव्याहत प्रयत्नामुळे आपणास जे राजकीय हक्क प्राप्त होतील ते फक्त एका विवक्षित कालमर्यादे- पर्यंतच अबाधित राहातील हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदुस्थानात असा एक काळ येईल की ज्यावेळी केवळ आपलेच नव्हे तर सर्व समाजांचे राखीव हक्क नष्ट केले जातील. कारण त्यांची मुळीच आवश्यकता पडणार नाही. जेव्हा असे घडेल तेव्हा आपणास आपली संघटना, शक्ती व एकी यांच्या बळावर अवलंबून राहावे लागेल. म्हणून अभेद्य संघटना निर्माण करावयाचा दृढ निश्चय करा.

हालअपेष्टा सहन करण्यातच तुमची अभ्युत्रती आहे व म्हणूनं आपत्काळी धीर सोडू नका. त्यातूनच तुमच्यात दिव्य तेज निर्माण होईल, हा एकच एक संदेश मला द्यावासा वाटतो. काही खेड्यात आपल्या दलितांवर होत असलेल्या अन्यायामुळे व अत्याचारामुळे तुम्ही हिम्मत सोडता कामा नये. पूर्ण संघटित होण्याच्या कृतनिश्चयाने प्रेरित होऊन नव्या दमाने, प्रफुल्लित अंतःकरणाने [व ] नवोत्साहाने अव्याहत कार्य करण्याच्या मार्गाला आपण लागलो पाहिजे म्हणजे या देशातील कोणत्याही हालअपेष्टांची आपणास मुळीच मातब्बरी वाटणार [नाही. ]