१०-१०-१९४७ अल्पसंख्याकांची समजून घातलीच पाहिजे; त्यांच्यावर जुलमी अधिकार चालवता कामा नये - Page 117

अल्पसंख्यांकांची समजूत . . . . . . चालवता कामा नये ७९

म्हणतो अशा प्रकारच्या शिक्षणाची संधी तुम्हाला मिळत नाही ही खेदाची गोष्ट आहे. जर तुम्हाला पॅरिस, लंडन किंवा अमेरिका या ठिकाणी जाण्याची संधी मिळून. त्या त्या ठिकाणची अशी अधिवेशने पाहण्यास मिळतील तर तुम्हाला या तीन सभागृहातील मजेशीर मतभेद पहावयास मिळतील. पॅरिसचे सभागृह हा एक आश्‍चर्यकारक प्रकार आहे असे तुम्हास दिसून येईल. एकदा मी पॅरिसच्या कनिष्ठ सभागृहात लांगोपाठ दोन किंवा तीन दिवस गेलो आणि तिथला तो प्रकार पाहिल्यानंतर क्रॉफर्ड मार्केट मध्ये आणि त्या भव्य सभागृहात मला काहीच फरक वाटला नाही. सभागृहात माणसे सारखी इकडून तिकडे जात होती व त्या ठिकाणी शिस्त अशी काहीच नव्हती. अध्यक्षाचे कुणी ऐकत नव्हते आणि बिचारे अध्यक्ष महाराज आपल्या मेजावरील असलेला एक मोठा लाकडाचा ओंडका व एक लाकडाचाच बनवलेला हातोडा, गृहात शांतता प्रस्थापित करण्यासाठी टेबलावर एकसारखा आपटत होते. पण तिकडे कुणाचेच लक्ष नव्हते. परंतु लंडनमधील कॉमन्सच्या सभागृहात मात्र अगदी याच्या उलटचा प्रकार तुम्हास दिसेल. त्या ठिकाणी असा एक नियम आहे की ज्यावेळी अध्यक्ष उभे असतात त्यावेळी कुणीही आपल्या जागी उभे असता कामा नये. प्रत्येक सदस्याने बसलेच पाहिजे. तसेच ज्यावेळी गृहात एक सदस्य उभा असतो तोपर्यंत दुसऱ्या कुणीही सदस्याने आपल्या जागी उभा असता कामा नये. त्याने बसूनच ते ऐकले पाहिजे. अध्यक्षांनी परवानगी दिल्यावाचून कॉमन्स सभागृहात कुणीही सदस्य भाषणाला सुरवात करू शकत नाही. तसेच अध्यक्षावर त्या ठिकाणी अमुकच एका व्यक्तीला भाषण करण्याची परवानगी दिली पाहिजे असे नाही. तिथे असा एक वाकप्रचार आहे की, ''आपल्या दृष्टीक्षेपात येईल अशाच सदस्याला अध्यक्ष भाषण करण्याची परवानगी देतील. पण त्या वाकप्रचारात एक प्रघात आहे आणि तो म्हणजे अध्यक्ष एखाद्या सदस्याकडे पहातील व त्याला भाषण करण्याची परवानगी देण्याऐवजी फक्त डोळे मिचकावतील अर्थातच याचे कारणही उघड आहे. अनेक वर्गाच्या सहवासामुळे अध्यक्षांना प्रत्येक सदस्याची माहिती असून त्यांना त्याचे बरेवाईट गुण अवगत असतात, फक्त अध्यक्षांना त्यांच्या कौटुंबिक इतिहासाचीच काय ती माहिती नसते. यासाठी अध्यक्ष कंटाळवाणे चप्हाट वळणाऱ्यांना किंवा ज्यांच्या भाषणात जीव नसतो अशा सदस्यांना भाषणाची सहसा परवानगी देत नाहीत.

जिला पार्लमेंटरी लोकशाही म्हणता येईल अशा स्वरुपाची लोकशाही आज आपल्याकडे आहे. तेव्हा त्या शब्दाचा काय अर्थ आहे ते आपण पाहू. एकतंत्री राज्यव्यवस्था आणि ही लोकशाही यामधील फरक एवढाच की एकतंत्री राज्यव्यवस्थेत कायदे करणारी सभा किंवा पार्लमेंट नसते. जनतेच्या इच्छेला