१४-१-१९४८ राजकारणाच्या दोऱ्या विद्योशिवाय हाती येणार नाहीत - Page 124

ट६' डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

विद्यार्थ्यापुढे भाषण करताना माझे मन द्विधा होई. उच्चवर्णीयांपुढे महाराचा पोरगा बोलताना त्याची टिंगल होईल, अशी भीती मला वाटत असे. मी वादविवाद मंडळामध्ये फारसा भाग घेतला नाही. ' मी चांगला बोलू शकेन असे त्यावेळी मला वाटत नसे. मी इंग्रजी भाषा चांगल्या तऱ्हेने लिहितो. निदान माझे मला तरी त्यावेळी वाटत असे.

मी फार पराकाष्ठेचे प्रयत्न याबाबतीत केले आहेत. १३-१३ वेळा मी माझे भाषण लिहून काढले आहे. यापेक्षा कोणालाही काही अधिक सांगता येणार नाही अशी जेव्हा माझ्या मनाची पक्की खात्री होईल तेव्हाच मी भाषण करीत असे.

आज थोडे जे काही मी बोलू शकतो ते पूर्वपरिश्रमाने अवगत केलेल्या ज्ञानामुळेच बोलतो, असे म्हणावे लागेल.

आज झालेल्या विद्यार्थ्याच्या भाषणाकडे मी वक्‍्तृत्त्वाच्या दृष्टीने पाहात नाही. भाषणाकडे माझे लक्ष दुसऱ्याच दृष्टीने होते. सर्वाच्या भावनांमध्ये मला एकच सूर दिसला. ही उल्लेखनीय गोष्ट आहे. माझ्या मनाला पदू लागले की मी २० वर्षे शेतकऱ्याप्रमाणे शेती केली, नांगरट केली, दगडधोंडे बाजूला काढले, तिच्यामध्ये अंकुर फुटला आहे. हे पाहून मला आनंद वाटतो. मी असंख्य लोकांपुढे भाषणे केली आहेत. चिक्कार लोक माझ्या भाषणात येत असत. त्यावेळी मला वाटत असे, ही माझी बुवाबाजी तर नव्हे ना? पण जी आजच्या तरूणांमध्ये जागृती दिसून आली त्यावरून त्यांना संसारात दर्जाने राहावयाचे आहे, पूर्वजांप्रमाणे कलंकित म्हणून राहावयाचे नाही, हा एकच सूर सर्वांच्या भाषणात मला दिसून आला.

शिक्षण व विद्या या गोष्टीशिवाय आपला उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगिकारिली. राजकारणात माझा विशेष महत्त्वाचा काळ गेला. सध्या राजकारणाच्या दोऱ्या उच्चवर्णियांच्या हातात आहेत. त्या दोऱ्या तशाच हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णियांची धडपड चाललेली आहे. उच्च प्रतीच्या माऱ्याच्या जागा पटकाविण्यासाठी जी विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णियांखेरीज इतरांना प्राप्त झालेली नाही. ' जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच": `: ' असे काही म्हटले जाते. त्याचप्रमाणे राजकारणाच्या दोऱ्या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत. राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविलेले आहेत पण त्यांना यश येत नाही. ह्या तफावतीचे अधिष्ठान हेच आहे. इंजिनिअर, कलेक्टर वगैरे जागा फक्त उच्चवर्णियांनाच शिक्षणामुळे मिळतात. शंभरपैकी जवळ जवळ ९९ इंजिनिअर, ९९ कलेक्टर असे उच्चवर्णियांचे असतात. त्यामुळे त्यांच्या हाताखालील जागा ते आपल्या लोकांना देत असतात.