१८-४-१९४८ धार्मिक कायदा विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा, ह्या लढ्यात धार्मिक कायद्याचे वर्चस्व, हा देशाचा र्हास (???) - Page 126

२५३

धार्मिक कायदा विरूद्ध धर्मनिरपेक्ष कायदा,

ह्या लढ्यात धार्मिक कायद्याचे वर्चस्व,

हा देशाचा ऱ्हास

नवी दिल्ली येथे लॉ. युनियनच्या वार्षिक दिनानिमित्त ' हिंदी संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे ' या विषयावर भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

प्राचीन हिंदू समाजात ' कायदा ईश्वर प्रणीत आहे ' अशा प्रकारचे कित्येक अपसमज रूढ होते. त्यामुळे एके काळी प्रगतीच्या शिखरावर असलेले आपले . राष्ट्र तसे प्रगतीशील राहू शकले नाही. धार्मिक कायदा विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा असा लढा येथेही झाला. परंतु दुर्दैवाने धार्मिक कायदा येथे श्रेष्ठ ठरला. देशाच्या ऱ्हासाचे ते एक प्रमुख कारण ठरले.

आमच्या प्राचीन समाजानी समाजाच्या धारणेतील दोष काढून टाकण्याची केलेली टाळाटाळ हेच त्या समाजाच्या नाशाचे कारण आहे. उलट मनुसारख्या शास्त्रवेत्त्यांनी जे निर्बंध तयार केले त्यांनाच चिकटून राहाण्याची त्यांची प्रवृत्ती होती. समाजाचे दोष सुधारणे हेच कायद्याचे उद्दिष्ट असते.

संस्कृती सुधारणेचे कार्य सतत असे कधीच घडले नाही. एके काळी काही समाज व राष्ट्र प्रगतीशील न राहिल्यामुळे त्यांचा नाश झाला, हिंदुस्थानच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास ही गोष्ट सहज ध्यानात येइल.

सध्याची विधिमंडळाची पद्धती आपण युरोपियन राष्ट्रांपासून विशेषतः इंग्लंडपासून उचलली असा सर्वसामान्य माणसाचा ग्रह आहे. . पण एखाद्याने ह्यादृष्टीने ' विनय पिटीका ' या प्राचीन ग्रंथाची पाने चाळली तर त्याचा हा भ्रम दूर होईल. विनय पिटीकेच्या अभ्यासकांना विधिमंडळ विषयक पद्धतीचे काही नियम माहित होते. प्रस्ताव मांडला नाही तर विधी मंडळात चर्चा होणार नाही तसेच मत नोंदणीही होणार नाही ही गोष्ट नवी आहे असा कित्येकांचा समज आहे. तो एक सर्वमान्य अपसमज आहे.

गरुड : १८ एप्रिल, १९४८.

भाषणाची तारीख दर्शविलेली नाही--संपादक.