१८-४-१९४८ धार्मिक कायदा विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा, ह्या लढ्यात धार्मिक कायद्याचे वर्चस्व, हा देशाचा र्हास (???) - Page 127

धार्मिक कायदा विरूद्ध . . . . . हा देशाचा ऱ्हास ८९

बहुतेक सर्वांचा समज असा आहे की गुप्त मतदान पद्धती आपण इंग्रजांपासून उचलली. अर्थात हाही गैरसमज आहे. ' विनय पिटिकेत ' गुप्त मतदानाची विशिष्ट व्यवस्था असे. त्यांना ' सालपत्रकगृहे ' असे म्हणत. झाडाच्या सालीचा मतपत्रिका म्हणून उपयोग करीत. काही कारणांमुळे आम्ही आपली राजकीय दृष्टी गमावली ही गोष्ट मी मान्य करतो. आमच्या विधिमंडळासारखा सर्व लोकसंस्थांचा नाश झाला व आम्ही एकतंत्री राजाचे नागरीक बनलो. त्यामुळेच सुसंस्कृती परागतीकडे वळली आणि इतर समाजाप्रमाणे हिंदी समाजही वेळोवेळी मागे पडत चालला.

समाजातील दोषाचे निर्मूलन करणे हाच कायदा करण्याचा हेतू असतो. दुर्दैवाने प्राचीन समाजांनी समाजातील दोष काढून टाकण्यासाठी कायद्याचा उपयोग केला नाही. त्यामुळे त्यांचा नाश झाला.

ह्या देशात जितक्या क्रांत्या झालेल्या आहेत तितक्या पृथ्वीतलावरील कोणत्याही राष्ट्रात झालेल्या नाहीत. पोपचे वर्चस्व झुगारुन देण्यासाठी युरोपात जेव्हा झगडे झाले त्याच्या आधी कित्येक वर्षे हिंदुस्थानात धर्माधिष्ठित कायदा विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा असा झगडा चालू होता. दुर्दैवाने हिंदुस्थानात धार्मिक कायदा श्रेष्ठ ठरला, माझ्या मते देशावर ती एक फार मोठी आपत्ती ओढवली. कायद्यात बदल करता येत नाही असा समज हिंदू समाजातील प्रतिगामी लोकांमध्ये त्याकाळी रूढ होता हेच ही आपत्ती ओढवण्याचे कारण आहे असे माझे मत आहे.