२५४
मी पाषाणासारखा घट्ट,मला विरघळण्याची भीती नाही
तुमची स्थिती वेगळी, ढेकळासारखे विरून जाल
संयुक्त प्रांत शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे ५ वे अधिवेशन लखनौ येथे ता. २४ व २५ एप्रिल १९४८ रोजी आयोजित करण्यात आले.
गतसाली याच ठिकाणी राजकीय हक्क शाबीत करण्यासाठी तसेच माणुसकीचे समानत्व जाहीर करण्यासाठी, शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वतीने सत्याग्रहाची मोहीम चालविली होती. २००० पेक्षा अधिक दलित स्त्री-पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. त्या सर्वांची लखनौ येथे धरपकड़ होऊन, त्यांना तुरुंगामध्ये गिरफ्तार करण्यात आले होते. संयुक्त प्रांताच्या अखिल अस्पृश्य जनतेचा हा फार मोठा त्याग होता. सत्याग्रहातून मुक्त झालेल्या स्त्री-पुरुषांची आतापर्यंत एकच भाविक इच्छा होती आणि ती म्हणजे दलितांना मुक्तिचा मार्ग दाखविणारे निर्भय नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन होऊन, पावन करणारा त्यांचा उपदेश ऐकण्याचे पुण्य लाभावे. या सदिच्छेचे व प्रयत्नाचे दृश्य फळ म्हणजे लखनौ येथे केलेले डॉक्टर बाबासाहेबांचे भाषण. हे भाषण अस्पृश्यांच्या चळवळीस ऐतिहासिक वळण देणारे आहे, याबद्दल संशय नाही.
श्री. गयाप्रसाद, ज. से. संयुक्त प्रांत शे. का. फेडरेशन यांच्या प्रयत्नाने तसेच (१) बाल गोविंद (२) कन्हय्यालाल सोनकर (३) चौधरी बुद्धदेव व (४) मेवालाल सोनकर यांच्या सहकार्याने अधिवेशन यशस्वी झाले. अधिवेशनास १,००,००० पेक्षा अधीक दलित समुदाय होता. ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे ज. से. राजभोज हेही हजर होते. श्री. गोपिचंद विप्पल (प्रेसिडेंट संयुक्त प्रांत समता सैनिक दल), श्री. तिलकचंद कुरील (प्रेसिडेंट संयुक्त प्रांत शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन) हे तेथील मुख्य संघटक व आधारस्तंभ आहेत.
हे अधिवेशन वैशिष्ट्यपूर्ण होते असे म्हणावयास दोन कारणे आहेत. पहिले कारण असे की, कॉँग्रेस सरकारच्या राज्यात अजूनही अस्पृश्यांचा छळवाद थांबलेला नाही हे जगाच्या उघडकीस या परिषदेवरून आले आहे. दुसरे कारण हे की, देशाला प्रगतीकारक धोरणाकडे नेत नेत, अत्यंत हीनावस्थेत असलेल्या अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या करण्यासाठी दलित फेडरेशन कधीच कचरणार नाही, हे सिद्ध झाले आहे.
जनता : १ मे १९४८.