२५-४-१९४८ मी पाषाणासारखा घट्ट, मला विरघळण्याची भीती नाही. तुमची स्थिती वेगळी ढेकळासारखे विरुन जाल - Page 129

मी पाषाणासारखा घट्ट, . . . . . ढेकळासारखे विरून जाल ९१

या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रविवार दिनांक २५ एप्रिल १९४८ रोजी भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुंनो,

काँग्रेसमध्ये सामील होण्याने आपले काही हित साधेल असे मला मुळीच वाटत नाही. दिवसेंदिवस काँग्रेस दुर्बल होत असून समाजवादी बाहेर पडल्यामुळे ती अधिकच दुर्बल झाली आहे. अशावेळी या दोन्ही पक्षातील चुरशीचा लाभ घेऊन आपल्या पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाने जो पक्ष आपल्या अटी मान्य करील त्याच्याशी सहकार्य करून आपल्याला सत्ता हस्तगत करता येईल. सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.

काँग्रेसमध्ये जाऊन मागासलेल्या जमातींना सत्ता हस्तगत करणे अशक्य आहे. ती एक मोठी संस्था आहे. आपण त्यात प्रवेश करणे म्हणजे महासागरात पाण्याचा थेंब टाकण्यासारखे होणार आहे. त्या संस्थेत सामील होण्याने आपली उन्नती होणार नाही. जर काँग्रेस निरनिराळ्या गटात विभागली तरच आपल्याला आपला उद्धार करता येईल. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याने आपल्या शत्रुचे सामर्थ्य मात्र वाढेल. काँग्रेसची स्थिती आज आग लागलेल्या घरासारखी झाली आहे. त्यात प्रवेश करण्याने आपणच भस्मसात होऊ. येत्या दोन वर्षात काँग्रेसचा नाश झाला तर त्यात मला मुळीच आश्‍चर्य वाटणार

नाही,

समाजवादी आज काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे बळ निश्चितपणे कमी होणार आहे. अशा वेळी आपण तिसरा पक्ष या नात्याने आपली स्वतंत्र संघटना केली पाहिजे. जर कॉग्रेस किंवा समाजवादी यापैकी कोणालाही हुकमी बहुमत प्राप्त झाले नाही तर ते आपल्या मतांची भीक मागण्यासाठी येतील. अशावेळी आपला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या.अटी पुढे करून सत्तेतील समतोलपणा राखू शकतो.

सुमारे १२ वर्षापूर्वी लोथीयन समितीचा सभासद या नात्याने आपण लखनौला आलो होतो त्यावेळेपेक्षा येथील अस्पृश्यांमध्ये राजकीय जागृती अधिक झालेली आहे हे पाहून मला आनंद होतो.

गेल्या वर्षी संयुक्त प्रांतांमध्ये अस्पृश्यांनी केलेल्या सत्याग्रह चळवळीचा उल्लेख मी अभिमानाने करतो. ज्यांनी त्या चळवळीत भाग घेऊन क्लेश सहन केले त्या सर्वाचे मी अभिनंदन करतो. एकदा एखादी गोष्ट साध्य करण्याचा आपण निश्चय केला व त्या दृष्टीने प्रयत्नाला लागलो म्हणजे मार्गात कितीही अडचणी आल्या तरी ती गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो ही गोष्ट यावरून आपल्या ध्यानी आलीच असेल.