२५-४-१९४८ मी पाषाणासारखा घट्ट, मला विरघळण्याची भीती नाही. तुमची स्थिती वेगळी ढेकळासारखे विरुन जाल - Page 130

९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे माझ्या अनुयायांपैकी कित्येकांची परिस्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. त्यांच्या मनातील किंतू नाहिसा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

आपल्या घोषणेप्रमाणे येथील हिंदू , मुसलमान, शीख, अस्पृश्य वगैरे सर्वांना सत्ता दान करून ब्रिटिश येथून निघून गेले नाहीत. सिमला परिषदेतही फक्त काँग्रेसचे हाती सत्ता देण्यात येणार नाही असे स्पष्टीकरण व्हाईसराँयने केले होते. १९४६ साली शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनने प्राथमिक निवडणुकी जिंकल्या होत्या व विरोधकांना भुईसपाट केल्यामुळे फेडरेशनचे प्रातिनिधीक स्वरुप प्रस्थापित झाले होते. परंतु नंतर ब्रिटिशांनी आपले पूर्वीचे वचन न पाळता हिंदू , मुसलमान व शीख ह्यांचेच हाती सत्ता सोपविण्याचे ठरविले.

आपल्या राजकीय लढ्यातील तो अत्यंत चमत्कारिक काळ होता. सर्वत्र काळोख पसरला होता व आपल्याला आशेचा एकही किरण दिसत नव्हता. जमातीची फार मोठी जबाबदारी माझे शिरावर होती. अशा वेळी माझे मलाच कळत नव्हते. अशा परिस्थितीत कोणत्याही मार्गाने त्यांना नेण्यास मी तयार नव्हतो. परिस्थितीचे योग्य आकलन होईपर्यंत वाट पाहाण्याचे मी ठरविले.

२५ वर्षे काँग्रेस बरोबर लढा दिलात आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगी मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण तुम्ही का स्वीकारलेत असा प्रश्‍न मला विचारण्यात येतो. नेहमीच लढ्याचे तंत्र उपयोगी पडत नाही. कित्येक वेळा दुसऱ्या मार्गाचा अवलंब करणेही आवश्यक असते. ब्रिटिशांनी आपल्याला धोका दिला. आपल्यामध्येही कित्येक फितूर होतेच. एवढ्या मोठ्या प्रचंड संस्थेविरुद्ध लढत देणे त्यावेळी योग्य ठरले नसते. त्याच्यानंतर तडजोडीचा मार्ग शिल्लक उरतो. त्यादृष्टीने आपल्याला बरेच हक्क प्राप्त झाले आहेत. आपल्याला पाहिजे होते तेवढे जरी आपल्या पदरात पडले नसले तरीही आपण पुष्कळच गोष्टी साध्य करू शकलो.

आपल्याला विधिमंडळांतून व नोकऱ्यांतून राखीव जागा मिळाल्या आहेत व आपल्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र मतदार संघाची मागणी अमान्य करण्यात आली. इतर अन्य अल्प- संख्यांकांनाही ती गोष्ट साध्य करता न आल्यामुळे आपल्याला त्याबद्दल लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. काँग्रेस बरोबर लढा पुकारण्याची ही वेळ नव्हे. सहकार्य आणि समझोता या मार्गानेच आपण मिळेल तेवढे हस्तगत केले पाहिजे.