२५-४-१९४८ मी पाषाणासारखा घट्ट, मला विरघळण्याची भीती नाही. तुमची स्थिती वेगळी ढेकळासारखे विरुन जाल - Page 132

९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

माझे २५ एप्रिलचे ते भाषण उत्स्फूर्त होते. माझ्या भाषणातील काही मुद्दे मी खाली देतो. निरनिराळ्या प्रश्‍नांवरून माझ्या काही अनुयायांनी मजवर केलेल्या टीकांना उत्तर म्हणून हे मुद्दे मांडले.

पहिला मुद्दा असा : त्रिमंत्री शिष्टमंडळाच्या प्रयाणापासून मी मुग्धता स्वीकारावी याचे कारण काय ?

दुसरा मुद्दा असा : मी काँग्रेस सरकारात का सामील झालो ?

आणि तिसरा मुद्दा : भविष्यकाळी मी काय करावयाचे ठरविले आहे ?

पहिल्यास उत्तर म्हणून मी म्हणालो की अमात्य त्रयीकडे शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनने स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. आमची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. याला दोन कारणे होती. (१) मुस्लिमांच्या व शिखांच्या मानाने आपला पक्ष कमकुवत होता. (२) आमच्यामध्येच फाटाफूट होती. बरेच पंचमस्तंभी लोक भरले होते.

अमात्य मंडळाच्या निर्णयाने दलित वर्गाना काही वेगळे राजकीय अस्तित्वच नाही, असे ठरल्यासारखे झाले. बरे, राजकीय संरक्षण नाही म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनने सर्वनाशच ओढवून घेतल्यासारखे आहे असेही मला वाटले. माझ्यापुढे अथांग अंधःकार पसरला. मी तेव्हापासून कोणतेही निवेदन केले नाही, मुग्धता स्वीकारली त्याचे कारण असे आहे.

दुसऱ्या मुद्याबाबत बोलावयाचे तर मी काँग्रेसचा विरोधक व टीकाकार होतो, हे खरे परंतु त्याचबरोबर केवळ विरोधासाठी विरोध करणे मला कधीही मान्य नव्हते. सहकार्याने जर आपला लाभ होत असेल तर सहकार्याच्याच भावनेने वागले पाहिजे. म्हणूनच मी काँग्रेसशी सहकार्य केले. घटनेत जे काही संरक्षण आम्हाला मिळाले ते अशा सहकार्याअभावी मिळविता आले नसते. माझ्या विधानाला पूरक अशी काही उदाहरणेही मी या अनुषंगाने दिली.

मी मंत्रिमंडळात का सामील झालो, त्याचा खुलासा करताना मी पुढील दोन कारणे विशद केली. एक, मंत्रिमंडळात येण्यासाठी मला दिलेले आमंत्रण बिनशर्त होते व दोन, बाहेर राहाण्यापेक्षा सरकारात जाऊन अस्पृश्यांच्या हितसंबंधीचे रक्षण करणे जास्त सुलभ होते.

मी माझ्या भाषणात सांगितले की पूर्वग्रहदूषित असे वाईट कायदे आपल्याविरुद्ध होतील, याची भीती दलित वर्गानी बाळगू नये. त्यांनी भ्यावयास हवे ते वाईट कारभाराला. दलित वर्गांचे लोक या कारभारात नसल्यानेच हा कारभार दूषित