४-११-१९४८ खरेच, संविधानांतर्गत काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्यांस संविधान जबाबदार नसेल; माणसाची दृष्टता जबाबदार असेल - Page 146

१०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काझी सय्यद करिमुहीन--संविधानाचा मसुदा विचारार्थ ठेवण्याच्या प्रस्तावावर डॉ. आंबेडकरांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांचे भाषण लक्षणीय होते आणि मला खात्री आहे की, पुढील पिढ्यांपर्यंत एक महान घटनाकार म्हणून त्यांची निश्‍चितपणे नोंद होईल.

डॉ. पी. एस. देशमुख--माझे सन्माननीय मित्र डॉ. आंबेडकरांचे भाषण उत्कृष्ट दर्जाचे होते. सादर करण्यात आलेल्या मसुद्यावरील ते परिणामकारक भाष्य होते. सर्वांना विदितच आहे, ते एक नामांकित वकील आहेत आणि मला वाटतं त्यांच्यावरील जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जर त्यांना पूर्ण मोकळीक मिळाली असती तर या संविधानाला त्यांना वेगळा आकार देता आला असता.

डॉ. जोसेफ अल्बन डिसूझा--सुरवातीपासून शेवटपर्यंत तज्ञांना शोभेल असे तुलनात्मकदृष्ट्या श्रेष्ठ, स्वीकारण्यायोग्य, कार्यक्षम स्वरूपाचे संस्मरणीय दस्तावेज डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीने सादर केले आहे ''.*

दिनांक ४ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधानाचा मसुदा संविधान सभेला सादर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

' अध्यक्ष महोदय,

मसुदा समितीने संमत केलेला संविधानाचा मसुदा मी विचारार्थ या सभागृहास सादर करीत आहे.

ही मसुदा समिती, संविधान सभेत २९ ऑगस्ट, १९४७ रोजी पारित प्रस्तावानुसार नियुक्त करण्यात आली होती. संविधान सभेने नेमलेल्या केन्द्रीय अधिकार समिती, केन्द्रीय संविधान समिती, प्रांतीय संविधान समिती आणि मूलभूत अधिकार, अल्पसंख्यांक व आदिवासी क्षेत्रे इत्यादिच्या सल्लागार समितींच्या अहवालावर संविधान सभेने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने संविधान निर्मितीची जबाबदारी मसुदा समितीवर सोपविण्यात आली होती. संविधान सभेने असाही. निर्देश दिला होता की काही विशिष्ट बाबतीत भारत सरकार कायदा १९३५ च्या तरतुदींचा अवलंब करण्यात यावा. संविधान सभेने दिलेल्या निर्देशांपैकी मसुदा समिती कोणत्या बाबींचा विचार करणार नाही व कोणत्या बाबींमध्ये बदल करून पर्याय सुचविले आहेत याचा उल्लेख मी माझ्या २१ फेब्रुवारी १९४८ च्या पत्रात केला आहे. एवढा अपवाद वगळता संविधान सभेने दिलेल्या निर्देशांचे मसुदा समितीने प्रामाणिकपणे पालन केल्याचे आढळून येईल असा मला विश्‍वास आहे.

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अंड स्पिचेस, खंड १३ मधील पृष्ठ क्रमांक ७२, ७३, ७४, ७५ आणि ७७ वरील मूळ इंग्रजी उताऱ्याचे मराठी भाषांतर अतिथी संपादक मंडळाने केले आहे.