११० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रणालीत अध्यक्ष हा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो. सर्व प्रशासन त्याच्या स्वाधीन असते. संविधान मसुद्याअंतर्गत राष्ट्रपतींचे स्थान हे इंग्लंडच्या संविधानातील राजाच्या स्थानाप्रमाणे आहे. तो राज्याचा प्रमुख आहे, परंतु कार्यकारी मंडळाचा नाही. तो राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो परंतु राष्ट्राचे प्रशासन करीत नाही. तो राष्ट्राचे प्रतीक आहे. प्रशासनातील त्याचे स्थान प्रतिकात्मक शिक्क्याचे असून राष्ट्राचे निर्णय त्याच्या सही-शिक्क्यानिशी घोषित करण्यात येतात. अमेरिकेच्या संविधानानुसार अध्यक्षाच्या अधिकारात विविध विभागाचे सचिव कार्यरत असतात. त्याचप्रमाणे भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीच्या अधिकारात विविध प्रशासकीय विभागांचे मंत्री कार्यरत राहतील. इथे पुन्हा या दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. कोणत्याही सचिवाने दिलेला सल्ला मान्य करण्याचे बंधन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर नाही. भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीला मात्र त्याच्या मंत्र्यांनी दिलेला सल्ला मान्य करणे साधारणतः बंधनकारक आहे. ते त्यांनी दिलेल्या सल्ल्याच्या विरोधात, तसेच त्यांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू शकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष कोणत्याही सचिवाला कोणत्याही वेळी पदमुक्त करू शकतात. भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीला मात्र संसदेत जोपर्यंत मंत्र्यांच्या पाठीशी बहुमत आहे तोपर्यंत त्याला तसे करण्याचा अधिकार नाही.
अमेरिकेतील अध्यक्षीय शासनपद्धती ही कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्या विभाजनावर आधारित आहे, जेणेकरून अध्यक्ष आणि त्यांचे सचिव हे काँग्रेसचे सदस्य नसतात. मसुदा संविधानाला ही तत्त्वप्रणाली मान्य नाही. भारतीय संघराज्याचे मंत्री हे संसदेचे सभासद असतील, केवळ संसदेचे सभासदच मंत्री होऊ शकतील. संसदेच्या अन्य सभासदांप्रमाणेच मंत्र्यांनाही अधिकार असतात, जसे, ते संसदेत बसू शकतात, चर्चमध्ये सहभागी होऊ शकतात आणि तिच्या कामकाजात मतदान करू शकतात. अर्थात दोन्ही शासनपद्धती या लोकशाहीप्रधान आहेत आणि दोन्हीतून एकीची निवड करणे हे इतके सोपे नाही. लोकशाहीसत्तात्मक कार्यकारी मंडळाला दोन अटींची पूर्तता करावी लागते. एक--कार्यकारी मंडळ स्थिर असायला हवे आणि दोन--कार्यकारी मंडळ उत्तरदायी असले पाहिजे. दुर्दैवाने या दोन्हींची समप्रमाणात हमी देणारी पद्धती आतापर्यंत तरी अस्तित्वात येवू शकली नाही. अधिक स्थैर्य आणि कमी जबाबदारी अंतर्भूत असणारी पद्धत तुम्हाला मिळू शकेल किवा अधिक जबाबदारी व कमी स्थैर्य असणारी पद्धत मिळू शकेल. अमेरिका व स्वित्झरलँडमधील शासनपद्धतीत स्थैर्य अधिक पण जबाबदारी कमी आहे. दुसरीकडे ब्रिटिश शासनपद्धती अधिक जबाबदार असून त्यात स्थैर्य मात्र कमी आहे. याचे कारण स्पष्ट आहे. अमेरिकेचे