४-११-१९४८ खरेच, संविधानांतर्गत काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्यांस संविधान जबाबदार नसेल; माणसाची दृष्टता जबाबदार असेल - Page 160

१२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ह्या ग्रामसमुदायाचे अस्तित्व एका विभक्त राज्याचे स्वरुप धारण करीत असून मेटकाफच्या मते, आजवर घडून आलेल्या सर्व प्रकारच्या क्रांत्या आणि बदलांच्या प्रभावापासून भारतीय जनतेचे जतन करण्याच्या कामी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या ग्राम व्यवस्थेने अधिक योगदान दिले आहे. तसेच त्यांना मुक्त आणि स्वतंत्र जीवनाचा मोठ्या प्रमाणात उपभोग घेण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरली आहे. जिथे दुसरे काहीच टिकून राहात नाही तिथे ग्रामसमुदाय टिकून आहेत, यात काहीच शंका नाही. परंतु जे ग्रामसमुदायाचा अभिमान बाळगतात ते देशाच्या एकूण व्यवहारात आणि देशाचे भवितव्य घडविण्यात ग्रामसमुदायाचा किती नगण्य वाटा आहे आणि तो तसा का आहे याचा विचार करीत नाहीत. देशाचे भवितव्य घडविण्याबाबत त्यांच्या भूमिकेचे वर्णन स्वतः मेटकाफने केले आहे, तो म्हणतो, '' एकामागून एक राजेशाही कोसळतात, एकापाठोपाठ एक क्रांत्या घडत जातात; हिंदू, पठाण, मोगल, मराठा, शिख आणि इंग्रज हे सर्व एकापाठोपाठ एक राज्यकर्ते झालेत, परंतु ग्रामसमुदाय मात्र जसाच्या तसाच राहतो. संकटप्रसंगी त्यातील काहीजण शस्त्र धारण करतात आणि स्वत:ला सुरक्षित करतात. शत्रुसैन्य देशातून संचार करत जाते, ग्रामसमुदाय आपल्या थोड्याश्या गुराढोरांना आपल्या चार भींतींमध्ये एकत्र करुन शत्रुसैन्याला आव्हान न देता बिनधास्तपणे जावू देतात. "'

ग्रामसमुदायांनी देशाच्या इतिहासात अशाप्रकारची भूमिका पार पाडली आहे, हे माहित असताना कुणाला त्यांच्याबद्दल अभिमान का वाटावा ? सर्व प्रकारच्या संकटांमधून ते आजवर जिवंत राहिले ही वास्तवता असूही शकेल, परंतु केवळ जिवंत राहण्याला अर्थ नाही. ते कोणत्या प्रतीचे जीवन जगले हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. निश्‍चितपणे निम्नस्तरावर व स्वार्थ्याच्या पातळीवर. या ग्रामराज्यामुळेच भारताचा नाश झाला असे मी मानतो. प्रांतवाद व जातीयवादाचा निषेध करणारे खेड्यांचा पुरस्कार करण्यासाठी पुढे आलेले आहेत याचे मला आश्‍चर्य वाटते. खेडे काय आहे? केवळ स्थानिकतेचे डबके, अज्ञानाची गुहा, संकुचित मनोवृत्ती आणि जातीयवाद ? मसुदा संविधानाने खेड्याला नाकारले आणि व्यक्तिला तिचे घटक मानले याचा मला आनंद होतो.

अल्पसंख्यांकांसाठी केलेल्या सवलतीच्या तरतुदीमुळेही मसुदा संविधानावर टीका करण्यात येत आहे. यासाठी मसुदा समिती जबाबदार नाही. संविधान सभेने घेतलेल्या निर्णयांची ती अंमलबजावणी करते. माझ्या दृष्टीने, अल्पसंख्यांकांना सवलती देण्याचा संविधान सभेने घेतलेला निर्णय जो इथे कृतीत आणला आहे तो शहाणपणाचा आहे याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. या देशात अल्पसंख्य आणि बहुसंख्य या दोघांनीही चुकीचा मार्ग अनुसरला आहे. अल्पसंख्यांकांचे अस्तित्व नाकारणे ही बहुसंख्यांकांची चूक आहे. अल्पसंख्यांकांनी स्वतःचे अल्पसंख्यत्व गोंजारणे व त्याला चिरस्थायी