१२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मूलभूत अधिकारांवरील संपूर्ण टीका ही गैरसमजुतीवर आधारलेली आहे हे सांगताना मला खेद वाटतो. पहिली गोष्ट, मूलभूत अधिकारांना, मूलभूत नसलेल्या अधिकारांपासून वेगळे करण्यासाठी शोधलेल्या आधारावर करण्यात आलेली टीका भक्कम पायावर आधारित नाही. मूलभूत अधिकार हे अनिर्बंध असतात व मूलभूत नसलेले अधिकार अनिर्बंध नसतात असे म्हणता येत नाही. या दोहोतील वास्तविक फरक असा आहे की, मूलभूत नसलेल्या अधिकारांची निर्मिती पक्षांमधील कराराद्वारा होते तर मूलभूत अधिकार ही कायद्याची देण आहे. मूलभूत अधिकार ही राज्याची देण असली तरी राज्याला त्यावर मर्यादा घालता येणार नाही असे म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत मूलभूत अधिकार अनिर्बंध आहेत असे म्हणणे चूक आहे. अमेरिकेचे संविधान व मसुदा संविधानातील या विषयीचा फरक हा आकाराविषयी आहे, मूळ हेतूविषयी नाही. अमेरिकेतील मूलभूत अधिकार अनिर्बंध नाहीत हे वादातीत आहे. मसुदा संविधानात अंतर्भुत असलेल्या मूलभूत अधिकारांच्या अपवादांच्या समर्थनार्थ, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या किमान एका निवाड्याचा तरी उल्लेख करता येईल. मसुदा संविधानातील अनुच्छेद १३ मध्ये अंतर्भुत असलेल्या भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावरील निबंधाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या अशा एका निवाड्याचा उल्लेख करणे पुरेसे होईल. अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी हिंसात्मक मार्गाचा अवलंब करणाऱ्यांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने न्यूयाक फौजदारी अराजकता कायद्याच्या (Newyork Criminal Anarchy (30) संविधानात्मकतेविषयीच्या गिटलॉ विरूद्ध न्यूयार्क (७०४ > ॥१९७४०॥ या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की,
' संविधानाने बहाल केलेले भाषणाचे आणि मुद्रणाचे स्वातंत्र्य हे जबाबदारीशिवाय बोलण्याचे आणि प्रकाशित करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य बहाल करीत नाही. एखाद्याने कशाची निवड करावी किंवा एखाद्याला कोणत्याही प्रकारे बोलण्याचा अनिर्बंध आणि बेलगाम परवाना मिळाला आहे असे नाही आणि या भाषण स्वातंत्र्याचा दुरूपयोग करणाऱ्यांना शिक्षा होणार नाही असेही नाही. फार प्राचीन काळापासून हे मूलभूत तत्त्व प्रस्थापित झाले आहे. "
यामुळे अमेरिकेत मूलभूत अधिकार अनिर्बंध आहेत आणि मसुदा संविधानात मात्र ते नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे.
मूलभूत अधिकारांना मर्यादा घालावयाची असल्यास, अमेरिकेच्या संविधानात असल्याप्रमाणे, त्या मर्यादांची तरतूद संविधानातच करण्यात यावी आणि