१२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मसुदा संविधानात मूलभूत अधिकारांच्या पाठोपाठ “ मार्गदर्शक तत्त्वांची ** तरतूद केली आहे. सांसदीय लोकशाहीसाठी निर्मिलेल्या संविधानात ती नाविन्यपूर्ण बाब आहे. सांसदीय लोकशाहीसाठी निर्मिलेल्या संविधानात अशा तत्त्वांची तरतूद दुसऱ्या केवळ एकाच संविधानात करण्यात आली आहे ते म्हणजे आयरिश स्वतंत्र राज्याचे संविधान. या मार्गदर्शक तत्त्वांवर सुद्धा टीका करण्यात आली आहे. असे म्हटल्या जाते की, या निव्वळ पवित्र घोषणा आहेत. त्यांच्यात बंधनकारकतेचे सामर्थ्य नाही. अर्थातच ही टीका अनावश्यक आहे. अनेक शब्दांच्या माध्यमातून संविधानच.तसे म्हणत आहे.
जर असे म्हटल्या जात असेल की मार्गदर्शक तत्त्वांच्या पाठिशी कायद्याचे पाठबळ नाही तर मी हे मान्य करायला तयार आहे. परंतु त्यांच्या पाठिशी कोणत्याही प्रकारचे बंधनकारक सामर्थ्य नाही हे मान्य करण्यास मात्र मी तयार नाही. त्यांच्या पाठिशी बंधनकारक कायदा नसल्यामुळे ते निरर्थक आहेत हे सुद्धा मी मान्य करायला तयार नाही.
वसाहती आणि भारताच्या गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नरला प्राप्त झालेल्या अनुदेशांच्या संलेखाप्रमाणे (instrument of ॥॥5॥॥॥०॥०॥$) मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप आहे. मसुदा संविधानाने राष्ट्रपती आणि राज्यपालांना असे संलेख देण्याचे प्रस्तावित केले आहे. अनुदेशाच्या संलेखाची तरतूद संविधानाच्या ४ थ्या अनुसूचीमध्ये केली आहे. मार्गदर्शक तत्त्वे दुसरे काही नसून अनुदेशाच्या संलेखाचे दुसरे नाव आहे. फरक एवढाच की अनुदेश हे विधीमंडळ आणि कार्यकारी मंडळाला दिलेले आहेत. माझ्या मताप्रमाणे, अशा बाबीचे स्वागत व्हायला हवे. शांतता, सुव्यवस्था आणि चांगले सरकार यासाठी सामान्यत: सत्ता सोपविलेली असते, परंतु सत्तेच्या उचित उपयोगासाठी सत्तेसोबतच तिला अनुदेश देण्याचीही गरज आहे.
मसुद्यात प्रस्तावित असलेला संविधानातील अशा अनुदेशांचा समावेश, दुसऱ्याही कारणासाठी न्यायसंगत ठरतो. निर्माण करण्यात आलेल्या मसुदा संविधानात देशाला आवश्यक अशा सरकारच्या यंत्रणेची केवळ तरतूद केली आहे. विशिष्ट राजकीय पक्षाला सत्तारूढ करण्यासाठी काही देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या योजनेसारखी ही योजना नाही. संकल्पित व्यवस्थेने लोकशाहीच्या चांचण्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी सत्तेवर कुणी असावे हा निर्णय सर्वस्वी जनतेवर सोपविला आहे आणि तो तसा असावाच. पण सत्तेवर कुणीही येवो, तो सत्तेचा वाटेल तसा वापर करण्यासाठी स्वतंत्र असणार नाही. सत्तेचा वापर करताना त्याला अनुदेशांच्या संलेखाचा, (Instrument of Instructi0n8) ज्याचे दुसरे नाव मार्गदर्शक तत्त्वे असे आहे, आदर करावाच