डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १३४
हिंदुंच्या विरुद्ध झगडण्यात शहाणपणा आहे काय? अशी शंका पुष्कळांना त्यावेळी आली होती. तुमच्यापैकी पुष्कळांना तर वाटत होते. दरेकाला मोठी विवंचना पडली होती. डॉ. आंबेडकरांना पाठिंबा देणे कितपत योग्य आहे, असे म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल गेली होती. तुमच्यापैकी बरेचजण हताश झाले होते. मी सुद्धा विवंचनेत पडलो होतो. माझे पण धैर्य खचल्यासारखे झाले होते. पण आपली आजची मनोभूमिका व धैर्य यांची तुलना त्यावेळच्या मनोभूमिकेशी व धैर्याशी केली तर काय दिसून येते? १९४६ च्या अत्यंत बिकट प्रसंगातून आपण निभावून निघालो ही काही लहान सहान गोष्ट नव्हे. आता आपणास धैर्य आलेले आहे. ' तुम्ही काय करणार ' ? असे विचारल्यास तुमच्यापैकी प्रत्येकजण खात्रीने म्हणेल, '' आम्ही आपला पक्ष सोडणार नाही. '' , (टाळया) एवढे धैर्य आपल्यात आलेले आहे.
मला पुष्कळ लोक विचारतात तुम्ही भाषणे का करीत नाही ? संदेश का देत नाही ? मी भाषणे करीत नाही व संदेश देत नाही याचा अर्थ असा नव्हे की, मला तुमच्याबद्दल काही काळजी वाटत नाही. कळकळ नाही, अगर तुमचे भले व्हावे असे मी इच्छित नाही. प्रसंग ओळखून काम करणे भाग आहे. शत्रु कोण ? मित्र कोण ? अशा प्रसंगी काय केले पाहिजे ? या व अशा सर्व गोष्टींची चाचपणी करणे भाग आहे. अशा परिस्थितीत स्तब्ध बसून विचार करणे याशिवाय गत्यंतर नव्हे.
गेल्या इलेक्शनमध्ये आपला पराभव झाला पण लगेच एक वर्षाने झालेल्या म्युनिसीपल निवडणुकीत आपणास जय मिळाला आहे. आपण ८, १० जागा मिळवू शकलो. आपल्या उमेदवारांनी मिळविलेली मते इतकी प्रचंड होती की,
तेवढी मते होण्यासाठी कॉँग्रेसच्या तीन-तीन चार-चार उमेदवारांच्या मतांची बेरीज करावयास हवी. तेव्हा आपण कोणास भिण्याचे कारण नाही. आपले संख्याबल मोठे आहे. आपण संघटित झालो, आपली मते आपण विकली नाहीत, आपल्या मताचा दुरुपयोग केला नाही, जर ती योग्य कारणालाच वापरलीत तर आपणाला कोणाचेच डर बाळगण्याचे कारण नाही.
येत्या निवडणुकीमध्ये काय करावयाचे याचा विचार आज करण्याचे काही प्रयोजन नाही. निवडणुकीच्यावेळी कोणते पक्ष उभे राहातात हे पाहिले पाहिजे. आपण अल्पसंख्यांक आहोत. कोणा न कोणा पक्षाशी सहकार्य केल्याशिवाय आपले भागणार नाही. कोणाशी सहकार्य करावयाचे ते दरेक पक्षाचा कार्यक्रम पाहून ठरवावे लागेल. संगनमत करावयाचे जरी झाले तरी आपला पक्ष मोडून सामील होता कामा नये. आपला पक्ष कायम ठेऊनच इतर पक्षांशी संगनमत करण्याचे धोरण आपण ठेवले पाहिजे.