१६-१-१९४९ दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे मोठा मूर्खपणा आपली झोपडी शाबूत राखा - Page 176

१३८ ी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्य समाज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारण-ज्ञानी समाज आहे याबद्दल मला बिलकूल शंका नाही. (टाळ्यांचा कडकडाट) कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. आपले राजकारण यशस्वी करण्याकरिता आपल्या समाजास मोठ्या अधिकाराच्या जागा, म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे माऱ्याच्या जागा काबीज केल्या पाहिजेत.

जरी आपल्याला राखीव जागा मिळाल्या नसल्या तरी भिण्याचे कारण नाही. आपण सात कोटी लोक आहोत. आपण जर संघटित राहिलो तरच आपला पक्ष बलवान होईल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपला जो राजकीय संघ-शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन त्यालाच आपण चिकटून राहिले पाहिजे. (टाळ्यांचा कडकडाट, जयघोष) आपण जरी अल्पसंख्य असलो तरी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर संघर्ष करु. आपणास भिण्याचे कारण नाही.

(प्रचंड टाळ्या)

दुसरी गोष्ट अशी की, आपल्याला कधी दुसऱ्या पक्षाशी संगनमतही करावे लागेल. जो पक्ष आपले कल्याण करील तोच आपल्याला जास्त जवळचा. ज्यांचा कार्यक्रम जास्तीतजास्त आमच्या कार्यक्रमाशी जुळेल त्या पक्षाशी आम्हाला संगनमत करायला काही हरकत नाही. मग ती काँग्रेस असो, समाजवादी असो, अगर बहुजन समाजवादी असो.

वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. संघ फोडून तुटकपणाने दोघाचौघांनी दुसऱ्या संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहीत आहे की आपण कळपाने राहिले पाहिजे.

आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा. तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहाणार नाही. ब्राह्मणेतर पक्षाची काय दुर्दशा झाली? १९३२ सालपर्यंत आम्ही संगनमताने काम करीत होतो. त्यावेळी काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेसबाहेर राहून उपयोग नाही. आत शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल. बाहेरून किल्ला फोडता येणार नाही. ह्या समजुतीने ते काँग्रेसमध्ये शिरले. मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले. परंतु