दुसर्याच्या हवेलीत शिरणे . . . . . आपली झोपडी शाबूत राखा १३९
त्यांनी माझे ऐकले नाही. आपण आत शिरलो ती भयंकर चूक झाली असे आज ब्राह्मणेतर पक्षाच्या लोकांना वाटत आहे. आज ब्राह्मणेतर पक्ष नामशेष झाला आहे. ते आपली राहुटी कितपत बांधू शकतील याबद्दल मला शंका आहे.
आम्ही झोपडी मोडून समझौता करावयाचा हे मला बिलकूल पसंत नाही. झोपडी मोडून आम्ही काहीही करणार नाही.
मी देशधातकी गोष्टी करतो, असा आरोप पूर्वी माझ्यावर केला जात असे. पण त्या आरोपाचा फोलपणा सर्वाच्या नजरेस आता आला आहे. आमचा पक्ष देशाच्याविरुद्ध कधीच नव्हता. आम्ही देशाचा द्रोह केला नाही. ते एक कुभांड रचले होते. आमचा पक्ष शर्यतीत उतरला तर आमच्यापेक्षा कोणीच वरचढ होऊ शकणार नाही. आम्ही नेहमीच आघाडीला राहू. (टाळ्या)
आपणच खरा समाजवाद प्रस्थापित करू शक्. शेतकरी, कामकरी राज्य आपणच स्थापणार. कारण आपल्यात श्रीमंत व मध्यमवर्ग नाहीतच. आपण
सर्वच कामगार. आपण सर्वच गरीब. आम्हीच लोकशाही निर्माण करू. इतकेच काय कम्युनिस्टांचा कम्युनिझम राजकारणात आमच्या मागेच आहे. आमचा पक्ष तात्त्विक सिद्धीत मागे पडेल, असे. कधीच संभवत नाही. पुष्कळ पक्ष निघाले. त्या सर्वांना आमचा हेवा वाटतो. काँग्रेस पक्ष वगळल्यास हिंदमध्ये शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनसारखा दुसरा पक्ष नाही. सर्वाचे डोळे आमच्या पक्षाकडे लागून राहिले आहेत. आपला पक्ष हा गुळाच्या ढेपेप्रमाणे असून इतर पक्ष हे मुंगळ्याप्रमाणे आहेत. आमच्या पक्षाच्या सहकार्यासाठी हे इतर आमच्या पक्षाला मुंगळ्यासारखे चिकटायला पाहातात. त्यांच्याविषयी आपण अत्यंत जागरूक असले पाहिजे.
आपल्या लोकांची नीतीमत्ता सोज्वळ असावी. अस्पृश्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. याविषयी खात्री बाळगा. काँग्रेस म्हणते की परकीय सत्तेला हाकलून देऊन आम्ही क्रांती केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, परंतु ही अर्धवट क्रांती होय. खरी लोकशाही निर्माण करावयाची असल्यास आज हजारो वर्षे डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. (टाळ्या) क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. आसासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांतीच होऊ शकत नाही. ते चक्र आम्हीच
फिरवू. (टाळ्या)