१६-१-१९४९ दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे मोठा मूर्खपणा आपली झोपडी शाबूत राखा - Page 178

१४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सध्या मी राजबंधनात आहे. १९५० साली अगर तत्पूर्वी ते बंधन तुटेल किंवा संपेल. निवडणुका जवळच आल्या आहेत. त्याघेळी मी आपणाजवळ संपूर्ण व सगळ्या गोष्टी सांगेन. मी आपल्या समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद करून ठेवली आहे. परंतु त्या राखीव जागांसाठी लायक उमेदवार मिळत नाहीत. जे राजकीय हक्क मिळविले आहेत त्यांची अंमलबजावणी खरोखर होत नाही. कारण तेथे अधिकारी वरच्या वर्गाचे असतात.. म्हणून त्या माऱ्याच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजेत. |

राजकारणाइतकेच महत्त्व शिक्षण संस्थेला आहे. एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान, होतकरू व उत्साही तरुणांच्या हाती असते. ह्या दिशेने गेली काही वर्षे मी राजकारणाकडे थोडेसे दुर्लक्ष करून शिक्षण संस्थांकडे जास्त लक्ष पुरवीत आहे. मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये सध्या २,४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १६० विद्यार्थी आपले आहेत. त्यांचेसाठी भी दरवर्षी २१,००० रुपये खर्च करीत असतो. माझे सर्व लक्ष या गोष्टीकडे वेधले आहे. औरंगाबादला जाऊन तेथे कॉलेज काढण्याबद्दल विचार करीत आहे. हे सगळे “ नामदेवाचे लग्न पांडुरंगाने केले “ त्याप्रमाणे आहे.

घटना समितीने जो भावी राज्यघटनेचा मसुदा तयार केला आहे त्यात अस्पृश्यांच्या हक्कांची तरतूद करून ठेवली आहे. नवीन घटनेच्या ९ व्या कलमान्वये अस्पृश्यतेचा नायनाट करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा जातीभेद, उच्च-नीच भावना रद्द केली आहे. न्हाव्याने तुमचे केस कापले पाहिजे; धोब्याने तुमचे कपडे धुतले पाहिजे; देवळे, खाणावळी व उपहारगृहात आपणास उच्चवर्णीयांप्रमाणे वागविले पाहिजे. इतरांनी आपणास समानतेने वागविले पाहिजे. हा कायदा जो मोड़ील त्यास शिक्षा करण्यासंबंधी कायदा करण्याचे अधिकार मध्यवर्ती कायदेमंडळाकडे सोपविले आहेत. ह्याच गोष्टीची आपण किती वर्षपावेतो मागणी करीत आहोत.

आपण तीन प्रकारचे राजकीय हक्क मागत असू: एक, आमचे प्रतिनिधी कायदेमंडळात असावेत, दोन, लोकसंख्येच्या मानाने सरकारी नोकऱ्या राखून ठेवल्या पाहिजेत, तीन, स्वतंत्र मतदार संघ मिळावेत. फक्त एकच गोष्ट प्राप्त