२१-१-१९४९ परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने आणि प्रभावी संघटनेने राहा - Page 180

२५८
परावलंबी वृत्ती टाकून
एकजुटीने आणि प्रभावी संघटनेने राहा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब सवितादेवी [आंबेडकर ] [यांचा ] सत्कार समारंभ मनमाड मुक्कामी अत्यंत थाटाने साजरा झाल्यानंतर त्यांनी पूर्वनियोजित हैद्राबाद संस्थानातील दौऱ्यास ता. १६ जानेवारी १९४९ [च्या ] मध्यरात्रीस सुरूवात केली. मनमाड स्टेशन रात्रौ दीड वाजता त्यांनी सोडले व दौऱ्याचे पहिले ठिकाण औरंगाबाद येथे ता. १७ जानेवारी १९४९ च्या पहाटेस ते पोहचले. रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी गाडी थांबली त्या त्या सर्व स्टेशनवर त्यांचे हार्दिक सत्कार समारंभ सोज्वळतेने साजरे झाले.

प्रत्येक स्टेशनवर दलित जनता अफाट समुदायाने जमली होती. गॅसच्या बत्त्या व रंगीबेरंगी कागदी पताका यांच्या सुंदर सजावटीने जवळ जवळ सारी स्टेशने सजविली होती,

औरंगाबाद स्टेशन जनतेच्या अभूतपूर्व गर्दीने जणू फुलूनच निघाले होते. सर्व मतांचे, सर्व पक्षांचे लोक डॉक्टरसाहेबांच्या स्वागतासाठी हजर होते.

शेकडो हारतुरे डॉ. बाबासाहेबांना व सौ. सविताबाई आंबेडकरांना अर्पण करण्यात आले, त्यावेळी क्षणोक्षणी '' भीम भगवान की जय '' चा जयघोष होत होता. |

जुनी आठवण

औरंगाबादचे सिव्हील अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री. राजवाडे, डी. एस. पी. श्री. अष्टेकर व इतर पोलीस अधिकारीही आपल्या जाम्यानिम्यासह हजर होते. शिरस्त्याप्रमाणे पोलिसांचा “ गार्ड ऑफ ऑनर '' (मानाची सलामी) घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व मित्रमंडळीसह श्री. अष्टेकरांच्या मोटारीतून औरंगाबादेस स्थापल्या जाणाऱ्या सिध्दार्थ कॉलेजच्या जागेची पाहाणी करण्यासाठी गेले. मुक्रर केलेली जागा पाहिल्यानंतर औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळेही त्यांनी पाहिली. त्यापैकी '' पाणचक्की *' बघत असताना डॉ. बाबासाहेबांना १०-११ वर्षापूर्वीची एक जुनी आठवण झाली. ते अगदी मनमोकळेपणाने हसले व लागलीच श्री. भाऊराव गायकवाड यांना हाक मारून

जनता : ५ फेब्रुवारी, १९४९.