२६-२-१९४९ हिंदू आचारधर्मातील पडायला आलेल्या भागांची दुरुस्ती करण्यापलीकडे हिंदू कोड बिलात दुसरे काहीही नाही - Page 186

२६०
हिंदू आचारधर्मातील पडायला आलेल्या भागांची
दुरूस्ती करण्यापलिकडे हिंदू कोड बिलात
दुसरे काहीही नाही

हिंदू पार्लमेंटपुढे नव्या हिंदू कोड बिलाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी बिल मांडताना हिंदचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

तुम्हाला हिंदू आचार, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज ही कायम टिकवायची असतील तर जेथे दुरुस्ती अथवा सुधारणा करणे अगत्याचे असेल तेथे तशी दुरुस्ती अगर सुधारणा करण्यास काकू करू नका. हिंदूआचारधर्मातले जे भाग अगदी पडायला झाले आहेत त्यांची दुरुस्ती करण्यापलीकडे या बिलात दुसरे काहीही नाही.

विवाहाच्या बाबतीत जुन्या मताचे लोक व नव्या मताचे लोक या दोघांचेही समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुन्या मतांच्या लोकांना त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या समाजातीलच वधु-वरांची लग्ने लावण्याची परवानगी दिलेली आहे. तर नव्या मतांच्या लोकांनी त्यांच्या सद्सदविवेक बुद्धिला स्मरावे आणि मगच वाटल्यास त्यांच्या समाजाबाहेरील वधु-वरांशी विवाह करावेत, अशी त्यांना मोकळीक दिलेली आहे. |

हिंदू समाजाचा ९० टक्के भाग असलेल्या 'शूद्र' लोकात घटस्फोटाची चाल रूढच आहे. फक्त १० टक्के हिंदुंत घटस्फोटाची चाल नाही. तेव्हा या १० टक्के लोकांचा कायदा तुम्ही ९० टक्के लोकांवर लादणार काय, असा माझा तुम्हाला सवाल आहे ? (टाळ्या)

शास्त्रे घटस्फोटाचा अधिकार देत आली आहेत, असेच तुम्हाला आढळून येइल. वैवाहिक संबंध सुखाचे होण्यासाठी शास्त्रांनी केलेले नियम मोडून पायाखाली तुडवून भलत्याच रूढी त्यांच्याही वर चढल्या आहेत.

जगातील ज्या इतर लोकात घटस्फोट रूढ आहे त्यांचा अनुभव आपण घटस्फोटाचा अधिकार देण्याला पोषक असाच आहे.

जनता : २६ फेब्रवारी १९४९.

भाषणाची तारीख < शीवेलली नाही.