१५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
की, जर तुम्हास हे कोड मान्य करूनही यावर रूढीची जळमटे वाढू द्यावयाची असतील तर हे कोड पास करण्यात काही हशील नाही. कारण कायद्याला देखील पोखरून काढण्याची शक्ती रूढीपाशी असल्याने सदर कोड निर्जीव होऊन
पडेल.
मिताक्षर कायद्याप्रमाणे असणारी हिंदुंची संयुक्त कुटुंब पद्धती या कोडान्वये नष्ट करण्यात आली आहे काय, अशी शंका काही जणांनी प्रदर्शित केली आहे. संयुक्त कुटुंबामधील लोकांचे हिस्से स्वतंत्रपणे ज्यांच्या त्यांच्या नावे राहतील, अशी व्यवस्था सदर कोडमध्ये करण्यात आली आहे. ही मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे अशातला काही भाग नाही. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, चालू जमान्यात स्वतंत्रपणे राहाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. तेव्हा जरी या कोडामध्ये संयुक्त कुटुंबाचा संयुक्त अधिकार काढून घेण्यात आला असला तरी संयुक्त कुटुंब व्यवस्था टिकविण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सध्या मिताक्षर कायदा आहे त्या ठिकाणी दायभाग कायदा येईल, एवढीच व्यवस्था सदर कोडान्वये केलेली आहे.
स्त्रीला मिळणाऱ्या इस्टेटीचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आहे. याबाबतीत (१) स्त्री धन व (२) विधवेची इस्टेट, असे दोन भाग पडतात. जी इस्टेट पुरुषाकडील वारसा हक्कामुळे स्त्रीला मिळालेली असते तिला ' विधवेची इस्टेट ' म्हणतात. या बाबत सिलेक्ट कमिटीचा निर्णय असा आहे की, ज्याअर्थी इतर बाबतीत स्त्री आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याइतकी समर्थ व चतुर असते त्याअर्थी ' विधवेच्या इस्टेटी ' खाली मिळालेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासही ती समर्थ व चतुर आहे, असे समजले पाहिजे आणि म्हणूनच या कोडमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, स्त्रीला मिळणाऱ्या मालमत्तेवर तिचा संपूर्ण (अनियंत्रित) मालकी हक्क आहे.