१५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
शक्य तो त्वरित मागविला आहे. त्यांना सदर रिपोर्ट वर्किंग कमिटीपुढे सादर करावयाचा आहे.
वर्किंग कमिटीची हालचाल मोठी सूचक वाटते. विशेषत: तिचा समय महत्त्वपूर्ण आहे. सुमारे ३ वर्षानंतर १९, २० नोव्हेंबरलाच वर्किंग कमिटी बोलाविली आहे, ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. आता लवकरच घटना समितीचे काम संपेल आणि घटना जाहीर होताच, नवीन पार्लमेंट जन्मास येईल. नव्या पार्लमेंटातील अस्पृश्यांच्या हक्कांची जाणीव भारतवासियांना सदर वर्किंग कमिटी करून देईल. अस्पृश्य समाजाचे हक्क रक्षिण्यात व त्याजबद्दल डोळ्यात तेल घालून हालचाल टेहळण्यात वर्किंग कमिटी कर्तव्यतत्पर असल्याचा हा पुरावा आहे.
काँग्रेस अगर इतर पक्षांशी दलित फेडरेशनचे संबंध कसे असावेत याबद्दल अफवा पसरून जो नाहक गोंधळ उडाला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीने वर्किंग कमिटीचे ठराव उपयुक्त ठरतील यात शंका नाही.
अ. भा. द. फेडरेशनची वर्किंग कमिटी म्हणजे अस्पृश्य समाजाचे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. त्या न्यायालयाकडूनच अस्पृश्य समाजास खरा न्याय मिळेल आणि असा न्याय मिळवावयाचा असेल तर, वर्किंग कमिटीच्या आदेशाप्रमाणे वागण्यास व तनमनधन खर्चून दलित फेडरेशनची संघटना मजबूत करण्यास दरेक अस्पृश्य बांधवाने सज्ज झाले पाहिजे.
ठरल्याप्रमाणे ता. १९-२० नोव्हेंबर १९४९ रोजी, अ.भा. दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक श्री. डी. एल. पाटील (मध्य प्रांत) यांचे अध्यक्षतेखाली दिल्ली येथे भरली होती. सदर बैठकीचे कामकाज गुप्तपणे करण्यात आले. वर्किंग कमिटीच्या बैठकीत चालू राजकीय परिस्थितीचा खल सूक्ष्म- रितीने करण्यात आला आणि दलित फेडरेशनने पूर्वीचेच धोरण कायम ठेवावे असा निर्णय घेण्यात आला. तथापि दलित फेडरेशन असहकाराची भूमिका घेणार नाही असेही विषद करण्यात आले. जो पक्ष अस्पृश्यांकरता खास कार्यक्रम आपल्या पक्षात ठेवू शकेल आणि राजसत्तेचा समान हिस्सा देऊ शकेल, त्याच्याशी सहकार्य करण्याचा विचार दलित फेडरेशन करील, असेही जाहीर करण्यात आले. *