१५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आंध्र
(१) श्री. एवाडापल्ली
आसाम
(१) श्री. शेखीभाई
हैद्राबाद
५१) श्री. सुबय्या
या शिवाय, अ. भा. दलित फेडरेशनचे सर चिटणीस बापूसाहेब राजभोज हेही हजर होते. श्री. एन. शिवराज काही अपरिहार्य कारणास्तव येऊ शकले नाहीत. त्यामुळे वर्किंग कमिटीची बैठक मध्यप्रांतचे श्री. डी. एल. पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली.
दोन दिवसाचे कामकाज |
ता. १९ व २० असे दोन दिवस वर्किंग कमिटीचे कामकाज चालले होते.
पहिल्या दिवसाच्या कामकाजाची सुरूवात, दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. बापूसाहेब राजभोज यांच्या अहवाल वाचनाने झाली. तीन वर्षांच्या कार्याचा आढावा श्री. राजभोज यांनी आपल्या अहवालात घेतला. गेल्या सत्याग्रहाचे वर्णन करून त्यांनी सत्याग्रहींचे अभिनंदन केले. मद्रास, संयुक्तप्रांत, मध्यप्रांत या विभागातील दौऱ्यात त्यांना जे अनुभव आले त्याचेही वर्णन संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केले. निरनिराळ्या प्रांतिक शाखांमध्ये मोठीच शिथिलता आली आहे, यासंबंधीचा उल्लेख त्यांनी कटाक्षाने केला. प्रांतिक शाखांकडून फेडरेशनचे सभासद वाढविले जात नाहीत; हिशेब मिळत नाही; प्रचारार्थ दौरे काढले जात नाहीत अशातऱ्हेची तक्रार पुन्हा एकदा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समक्ष वर्किंग कमिटीच्या बैठकीत केली. श्री. राजभोज यांनी आपल्या अहवालाच्या शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. डॉक्टरसाहेबांनी घटना लिहिण्याची कामगिरी करून शत्रुकडून देखील वाहवा मिळविली हा त्यांचा व फेडरेशनचा विजय आहे, असे श्री. राजभोज म्हणाले. श्री. राजभोज यांना, संघटनेत शिस्त ठेवण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना मिळाल्या असून, त्याबद्दल ते लवकरच सर्क्युलर काढणार आहेत.