२०-११-१९४९ आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे - Page 193

आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे १५५

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण

श्री. राजभोज यांच्या अहवाल वाचनानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छोटेसे भाषण केले. डॉक्टरसाहेब आपल्या भाषणात म्हणाले.

आपली संघटना आपण स्वतंत्रच ठेवली पाहिजे. स्वतंत्र संघटनेशिवाय आपल्याला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही. सध्या जे लहान मोठे राजकीय पक्ष दिसतात, त्यांनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने कोणताच खास कार्यकम ठेवलेला नाही. तसा कार्यकम कोणी ठेवला असता तर त्याचा आम्ही विचार केला असता. पण म्हणून आपण काही अडून राहावयाचे नाही. आपण आपली सध्याची सुप्तावस्था फेकून दिली पाहिजे. येथून पुढे आपल्याला जे काही मिळवावयाचे आहे ते इज्जतीनेच मिळविले पाहिजे. कोणाची हांजी हांजी करून अथवा भीक मागून आम्हास काहीही नको. आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी मला निष्ठेची माणसे हवीत.

शेवटी, एक गोष्ट मला स्पष्ट कराविशी वाटते आणि ती ही की, जर तुम्हास माझे पुढारीपण मान्य असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे लुम्ही वागले पाहिजे.

चार महत्वाचे ठराव

तद्नंतर, दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिटीने चार महत्वाचे ठराव सम्मत केले. दलित फेडरेशनच्या सध्याच्या धोरणात कोणताच बदल करण्यात आला नसून, येत्या हंगामी पार्लमेंटच्या निवडणुकीच्या आमिशास दलित फेडरेशनच्या अनुयायांनी बळी पडू नये, असा आदेश पहिल्या ठरावान्वये देण्यात आला आहे. दुसरा ठराव समता सैनिक दलासंबंधी आहे. इतर स्वयंसेवक संस्थांनी जशी घातपाती व हिंसात्मक कृत्ये केली तशी कृत्ये समता सैनिक दलाच्या हातून कधीही घडली नसता आर. एस. एस. सारख्या संघटनावरील बंदी उठवावी आणि समता सैनिक दलावर मात्र ती तशीच राहावी त्याचा निषेध करणारा दुसरा ठराव

आहे.

अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या जनरल सेकेटरींना संघटनेबाबत महत्त्वाच्या सूचना देणारा तिसरा ठराव असून त्या ठरावान्वये [पक्षामध्ये ] [शिस्त ] ठेवण्यासाठी शिस्तभंगाचा इलाज करण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत. श्री. ठवरे, गोपालसिंग यांची दलित फेडरेशनमधून हकालपट्टी करण्याचे ठरविण्यात आले.

चौथा ठराव अ. भा. दलित फेडरेशनच्या आगामी खुल्या अधिवेशनासंबंधी आहे. येते अधिवेशन पंजाबमध्ये घेण्याचे ठरले असून अधिवेशनाची जागा व तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.