२५-१-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशाप मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही - Page 201

राजकीय पक्षांनी स्वत:च्या .. . . .. | आल्याशिवाय राहाणार नाही १६३

असेल यात शंका नाही. परंतु त्यांना याची स्पष्ट जाणीव दिसत नाही की. अनियंत्रितपणे वाहत जाणे आणि वाहताना नियंत्रण ठेवणे यात फरक आहे. परिस्थितीवर नियंत्रण असल्याशिवाय मसुदा समिती कधीही वाहत गेली नाही. मासा गळाला लागणार नाही अशा ठिकाणी केवळ ती गळ टाकून बसली नव्हती. जो मासा तिला पकडायचा होता, तो ज्या ठिकाणी मिळेल, अशाच ठिकाणी ती पाण्यात गळ टाकून बसली होती. अधिक चांगले शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वाहवत जाणे नव्हे. हे करण्यामागे मसुदा समितीचे अभिनंदन करण्याचा नाझीरुद्दीन अहमद यांचा उद्देश नसला तरी, त्यांनी मसुदा समितीचे अभिनंदन केले आहे असेच मी समजतो. मसुदा समितीने दोषपूर्ण वाटणाऱ्या दुरुस्त्या बाजूला सारुन त्याऐवजी तिला योग्य वाटणाऱ्या दुरुस्त्या स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा आणि धैर्य जर दाखविले नसते तर ती आपल्या कर्तव्यापासून ढळली व प्रतिष्ठेच्या खोट्या समजाला बळी पडली म्हणून ती दोषी ठरली असती. ही जर चूक असेल तर अशा चुका नि:संकोचपणे मान्य करुन त्या दुरुस्त करण्यासाठी मसुदा समितीने पुढाकार घेतला याचा मला आनंद आहे.

एकमेव सदस्याचा अपवाद वगळता संविधान सभेच्या सदस्यांनी मसुदा समितीने केलेल्या कार्याचा गौरवच केला याचा मला आनंद वाटतो. मसुदा समितीने घेतलेल्या परिश्रमाला उस्फूर्तपणे स्वीकारुन त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केल्यामुळे मसुदा समितीला आनंद होईल याची मला खात्री आहे. संविधान सभेचे सदस्य आणि मसुदा समितीचे माझे सहकारी यांनी माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव केला त्यामुळे मी इतका सद्गदित झालो आहे की त्यांच्या

प्रति माझी कृतज्ञता पूर्णतः व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे योग्य शब्द नाहीत. संविधान सभेत येताना अनुसूचित जातींच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यापलिकडे माझी दुसरी मोठी आकांक्षा नव्हती. यापेक्षा अधिक जबाबदारीचे कार्य करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात येईल याची पुसटशी सुद्धा कल्पना मला नव्हती. सभेने मसुदा समितीवर माझी निवड केली तेव्हा मला फार आश्‍चर्य वाटले. मसुदा समितीने तिच्या अध्यक्षपदी माझी निवड केली तेव्हा तर माझ्या आश्‍चर्याला पारावार उरला नाही. मसुदा समितीत माझे मित्र सर अल्लादी कुृष्णस्वामी अय्यर यांच्यासारखी माझ्यापेक्षा अधिक मोठी, चांगली आणि अधिक योग्य माणसे होती. माझ्यावर इतका विश्‍वास व्यक्‍त करुन आणि जबाबदारी सोपवून त्यांनी माझी निवड केली आणि देशाची सेवा करण्याची मला संधी दिली यासाठी मी संविधान सभा आणि मसुदा समितीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. (हर्षध्वनी)