१६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मला देण्यात आलेले श्रेय केवळ माझे नाही. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर बी. एन. राव, ज्यांनी मसुदा समितीच्या विचारार्थ संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला, त्यांचाही यात अंशत: वाटा आहे. श्रेयाचा काही वाटा मसुदा समितीच्या सदस्यांचाही आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही समिती १४१ दिवस कार्यरत होती आणि तिची, नवीन सूत्रे शोधून काढण्याची कल्पकता आणि विचारांच्या विविध मुद्यांना सामावून घेण्याच्या सहनशक्तीशिवाय संविधान निर्मितीचे हे अवघड कार्य यशस्वीरित्या पूर्णत्वास गेले नसते. श्रेयाचा मोठा वाटा संविधानाचा आराखडा तयार करणारे प्रमुख श्री. एस. एन. मुखर्जी यांच्याकडेही जातो. गुंतागुंतीच्या प्रस्तावांना सर्वात सोप्या आणि स्पष्ट कायदेशीर स्वरुपात परिवर्तित करण्याची तसेच कठोर परिश्रम घेण्याची त्यांची क्षमता कदाचितच कुणात आढळेल. समितीला लाभलेली ती एक ठेव आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय संविधानाच्या पूर्णत्वासाठी सभेला आणखी बरीच वर्षे लागली असती. श्री. मुखर्जी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख करणे मला टाळताच येणार नाही. किती कठीण काम त्यांनी केले आहे, किती कठोर परिश्रम त्यांनी घेतले आहेत. कधीकधी मध्यरात्रीपर्यंत ते राबले आहेत याची मला जाणीव आहे. त्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्या. सर्वांचे आभार मानतो. (हर्षध्वनी)
संविधान सभा जर विविध घटकांचा विस्कळीत समुदाय राहिली असती तर सिमेंटचा उपयोग न करता तयार केलेला रस्ता, जिथे इकडे काळा दगड तर तिकडे पांढरा दगड याप्रमाणे प्रत्येक सदस्य आणि प्रत्येक गट हा स्वतःतच एक कायदा असता, तर अशा स्थितीत मसुदा समितीला तिचे काम करणे फार अवघड झाले असते. गोंधळाशिवाय त्या ठिकाणी काहीच दिसले नसते. संमितीतील कॉँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाने कामकाज व्यवस्थित आणि शिस्तबद्धरित्या होऊ शकले, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याला जराही वाव मिळाला नाही. काँग्रेस पक्षाच्या या शिस्तिमुळेच मसुदा समितीला संविधानातील प्रत्येक अनुच्छेद आणि प्रत्येक दुरूस्तीच्या भवितव्याची खात्री असल्यामुळे, संविधान सादर करणे सुकर झाले. त्यामुळे मसुदा संविधान सभेमध्ये सुगमरित्या पारित होण्याचे श्रेय काँग्रेस पक्षाला सुद्धा द्यावे लागेल.
जर सर्व सदस्यांनी पक्ष शिस्तिला घट्ट बांधून घेतले असते तर संविधान सभेचे कामकाज खूपच निरस झाले असते. पक्ष शिस्तिच्या ताठरतेमुळे या सभेचे रुपांतर ' होय बा ' च्या समुहात झाले असते. सुदैवाने त्यात बंडखोरही होते. त्यात श्री. कामत, डॉ. पी. एस. देशमुख, श्री. सिधवा, प्रा. सक्सेना आणि पं. ठाकुरदास भार्गव यांचा समावेश होता. त्यांच्या सोबतच प्रा. के. टी. शाह