डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १६६
लोक आणि त्याचे राजकीय पक्ष कसे वागतील हे जाणून घेतल्याशिवाय संविधानाबाबत कोणताही निर्णय घेणे निरर्थक ठरेल.
साम्यवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोन घटकांकडून संविधानावर मोठ्या प्रमाणात नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. ते संविधानाच्या प्रती नापसंती का व्यक्त करतात ? खरोखर संविधान वाईट आहे म्हणून ते नापसंती व्यक्त करतात काय ? निश्चितपणे नाही असे मी म्हणतो. साम्यवादी पक्षाला कामगारांच्या हुकुमशाही तत्त्वावर आधारलेले संविधान हवे आहे. हे संविधान सांसदीय लोकशाहीवर आधारित असल्यामुळे ते संविधानाचा निषेध करतात. समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट त्यांना हवी आहे ती अशी की, ते जर सत्तारुढ झाले तर मोबदला न देता खाजगी संपत्तीचे राष्ट्रीयीकरण किंवा सामाजीकरण करण्याचे संविधानाने, त्यांना स्वातंत्र्य दिलेच पाहिजे. समाजवाद्यांना पाहिजे असलेली दुसरी गोष्ट अशी की, संविधानातील मूलभूत अधिकार निरपेक्ष आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय असावे जेणेकरुन त्यांच्या पक्षाला सत्ता प्राप्त करण्यात अपयश आले तर, केवळ अनिर्बंध टीका करण्याचेच नव्हे तर राज्य उलथून पाडण्याचेही स्वातंत्र्य त्यांना हवे आहे.
प्रामुख्याने या दोन कारणांमुळे संविधानावर टीका करण्यात येत आहे. संसदीय लोकशाहीचे तत्त्व हाच केवळ राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रकार आहे असे मी मानत नाही. मोबदला न देता खाजगी संपत्ती ताब्यात घेण्याचे तत्त्व इतके पवित्र आहे की त्यापासून फारकतच घेता येत नाही असे मी म्हणत नाही. मूलभूत अधिकार हे कधीही अनिर्बंध असू शकत नाही आणि त्यावर घातलेले निर्बंध केव्हाही उठविता येत नाही, असेही मी म्हणत नाही. मला सांगायचे ते हे की, संविधानातील अंतर्भूत मते ही आजच्या पिढीची आहेत किंवा प्रस्तुत विधान जर तुम्हाला अतिशयोक्तीपूर्ण वाटत असेल तर मी म्हणेन की संविधान सभेच्या सभासदांची ती मते आहेत. संविधानात त्यांचा अंतर्भाव केल्याबद्दल मसुदा समितीला दोष का देण्यात यावा ? मी म्हणतो की संविधान सभेच्या सभासदांवर सुध्दा हे दोषारोपण का करण्यात यावे ? अमेरिकेच्या संविधान निर्मिती प्रक्रियेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा अमेरिकेतील मुत्सद्दी जेफरसन, यांनी काही भारदस्त, अतिमहत्त्वाचे विचार व्यक्त केले आहेत, जे संविधान निर्मात्यांना कधीही नजरेआड करणे परवडण्यासारखे नाही. एके ठिकाणी त्याने म्हटले आहे, ते असे की :
“ प्रत्येक पिढी, बहुसंख्यांकांच्या इच्छेप्रमाणे स्वत:ला बांधून घेण्याचा अधिकार असलेल्या एका स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे आहे, येण्याऱ्या पिढीला कोणी बंदिस्त करु शकत नाही, जसे दुसऱ्या राष्ट्रातील लोकांना करता येत नाही."