१७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे. आणि सरतेशेवटी आणीबाणीचे अधिकार केन्द्राला देण्यामागे राज्यांवर कोणते उत्तरदायित्व येते ? एवढेच की, आणीबाणीच्या काळात स्वतःचे स्थानिक हितसंबंध जोपासण्यासोबतच, राज्यांनी एकूण राष्ट्राचे मत आणि हितसंबंध विचारात घ्यावे. ही समस्या ज्यांना नीटपणे कळलेली नाही तेच याविरुद्ध तक्रार करतील.
याठिकाणी मी माझे भाषण संपविले असते, परंतु माझे मन देशाच्या भवितव्याबाबत इतके चिंताग्रस्त आहे की, त्यासंबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा मी उपयोग करावा असे मला वाटते. २६ जानेवारी १९५० ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. (हर्षोल्लास) त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल ? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेविल की पुन्हा गमावून बसेल? हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो. असे नाही की भारत हा यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे. तो पुन्हा दुसऱ्यांदा ते गमाविल का ? भवितव्याबाबतचा हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करतो. भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर ते देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विशवासघातामुळे गमावले गेले ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते. महम्मद बीन कासीमने सिंध प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहार राजाच्या सैनिक अधिकाऱ्यांनी महम्मद बीन कासीमच्या हस्तकांकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाच्या बाजुने लढण्याचे नाकारले. महम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद होता. आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राजांच्या मदतीचे आश्वासन दिले. जेव्हा शिवाजी हिंदुंच्या मुक्तीसाठी लढत होता त्यावेळी इतर मराठा सरदार आणि रजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजुने युद्ध लढत होते. जेव्हा शीख राज्यकर्त्यांचा निःपात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते तेव्हा त्यांचा प्रमुख सेनापती गुलाबसिंग शांत बसला आणि शिखांचे राज्य वाचविण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही. १८५७ ला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्ययुद्धाची घोषणा कली, तेव्हा शीख बघ्याच्या भूमिकेतून त्या घटनेकडे पाहात राहिले.
इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रुंसोबतच भिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. ह्या वास्तवाच्या जाणीवेने मी अधिकच चिंतातूर झालो आहे. भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्त्वप्रणालीला मोठे मानतील ? मला माहित नाही. परंतु एवढे मात्र