२५-१-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशाप मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही - Page 212

१७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्त्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुन देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे, ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल.

ब्राईसच्याच शब्दात मी उद्घृत करु इच्छितो, ती घटना अशी--

'' काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक

अधिवेशनात त्यांच्या सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग

आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुन त्यात सर्व लोकांसाठी असलेल्या

प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि

न्यु इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, ' हे प्रभो, आमच्या

राष्ट्राला आशिर्वाद दे.' उत्स्फुर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात

आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला.

धर्मापदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी 'राष्ट्र' या शब्दावर आक्षेप

घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी

स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे, तो शब्द गाळण्यात आला आणि हे प्रभो,

या संयुक्त राज्यांना आशिर्वाद दे ' या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.''

ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्त्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना 'भारतीय लोक ' या शब्दाची चीड येत असे. ' भारतीय राष्ट्र ' म्हणणे ते पसंत करीत असत. मी या मताचा आहे की, आपण एक राष्ट्र आहोत यावर विशवास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल ? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्त्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गाचा आणि उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शक्‌. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे, अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या