१७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पार्लमेंटच्या अधिवेशनात कसे बोलता येईल, असा आक्षेप कोणीही उपस्थित करील. ही गोष्ट लक्षात ठेवून सदर अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधून काढला. तुमच्या पार्लमेंटने एक ठराव संमत करावा आणि त्या ठरावान्वये मला बोलण्यास सांगावे, असा माझा मार्ग होता. त्याप्रमाणे ठराव पास करून घेण्याचे चेअरमनांनी कबूल केले याबद्दल मला आनंद वाटतो आणि म्हणून आता मी तुमच्या पार्लमेटपुढे भाषण करीत आहे.
तुम्हास माहीत आहे की, मी भारतीय पार्लमेंटमध्ये मांडलेल्या हिंदू कोड बिलावर सध्या वादविवादाचे मोठे रण माजले आहे. या बिलाचे संपूर्ण विवेचन करावयाचे म्हटल्यास कमीत कमी दोन तास तरी लागतील. तेवढा वेळ तुम्हालाही नाही आणि मला देखील नाही. तरी परंतु तुम्हा विद्यार्थ्यांचा वर्ग हा जागृत व डोळस वर्ग असल्याने जेवढ्या थोड्या वेळात हिंदू कोड बिलावर माझे विचार मांडता येतील तेवढ्या वेळात ते मांडण्याचा मी प्रयत्न करीन.
या बिलाच्या कलमांची तपशीलवार अशी माहिती तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांना नसेल. कारण, तुम्ही तुमच्या नित्याच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षेत गुरफटलेले असता. तरीपण हे बिल आजच्या व भावी पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने व त्यामुळे आपल्या देशाचे कोणकोणते फायदे होणार आहेत हे नागरिक या नात्याने माहीत होणे जरूर असल्याने सदर बिलासंबंधीचे काही विशेष मी सांगणार आहे.
हिंदू कोड बिलामागे मुख्यतः दोन उद्दिष्टे आहेत. हिंदू कायदा सर्व देशभर सुसूत्र करणे हे पहिले उद्दिष्ट आहे. यालाच इंग्रजी भाषेत ' कोडीफिकेशन ' म्हणतात आणि हिंदू कायद्याच्या काही शाखांची सुधारणा घडविणे हे दुसरे उद्दिष्ट आहे. या दुसऱ्या उद्दिष्टावरच सर्व वादविवाद केंद्रित झाला आहे.
पहिल्या उद्दिष्टापुरतेच बोलावयाचे झाल्यास त्याबद्दल कोणाचा वाद नाही आणि असणेही शक्य नाही. हिंदू कायद्याच्या सुसूत्रीकरणावर जवळ जवळ सर्वांचे एकमत आहे. कारण कोणताही कायदा घेतला तर त्यास ज्या काही मूलभूत कसोट्यांची पूर्तता करावी लागते त्या कसोट्या हिंदू कायद्यास आणणे जरूर आहे
कोणताही कायदा तीन मूलभूत कसोट्यास उत्रावा लागतो. या कसोट्या अशा :--
(एक) कायदा ' निश्चित 'असावा लागतो. त्याच्या कोणत्याही कलमाबद्दल
अगर तरतुदीबद्दल शंका, संदिग्धता राहाता कामा नये. त्याचा अर्थ सुस्पष्ट,
स्वच्छ असला पाहिजे. कायद्यावरची ही पहिली कसोटी आहे.