११-१-१९५० हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरणे केले पाहिजे - Page 217

हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे १७९

(दोन) कायदा हा सर्व ठिकाणी सारखा असावा लागतो. प्रादेशिक

फेरफारांनी तो जखडलेला असता कामा नये. मुंबईस खून झाला तर

आरोपीस जी शिक्षा मिळाली तीच शिक्षा त्रिचनापल्लीस झालेल्या खुनाबद्दल

तेथील आरोपीस मिळाली पाहिजे. कायद्याची ही दुसरी कसोटी आहे.

(तीन) कायदा सर्व जनतेला आश्रय घेता येईल असा माफक व सुबोध

असला पाहिजे. आपले हक्क काय आहेत हे दरेक नागरिकास समजले

पाहिजे. हरघडी त्याने वकिलावरच विसंबले पाहिजे असा कायदा असू

नये. कायद्याची ही.तिसरी कसोटी आहे.

या कसोट्यांवर आजपर्यंत हिंदू कायदा वाचून पाहिला तर काय दिसते ? वरील कसोट्यांपैकी एकाही कसोटीस हिंदू कायदा उतरत नाही. जगातील भोंगळ कायद्याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास हिंदू कायद्याचेच द्यावे लागेल. हिंदू कायद्याइतका अनिश्‍चित, एकसुत्रीपणाचा अभाव असलेला आणि महाग कायदा जगात सापडणार नाही. या बाबतीत आणखी विवेचन करण्याचे कारण नाही. हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे ही गोष्ट सर्वांना मान्य आहे.

आता, हिंदू कोड बिलामागील दुसऱ्या म्हणजे सुधारणा करण्याच्या उद्दिष्टाकडे वळू. वर सांगितल्याप्रमाणे या बाबतीतच विरोधकांनी आकांडतांडव चालविले आहेत. हिंदू कायद्यामध्ये सदर बिलान्वये कोणती सुधारणा सुचविली आहे हे पाहिल्यास विरोधकांचे म्हणणे रास्त आहे की गैर हे दिसून येईल.

हिंदू कोड बिलान्चये एकंदरीत पाच प्रकारच्या सुधारणा सुचविल्या आहेत. त्यापैकी दरेक प्रकारच्या सुधारणेची थोडी माहिती घेणे अवश्य आहे.

पहिली सुधारणा विवाह, दत्तक आदीविषयी जो जातीचा संबंध येई त्यासंबंधीची आहे. जुन्या व चालू हिंदू कायद्याप्रमाणे विवाह व दत्तक हा ज्या त्या जातीतच घडत असे व आजही घडतो. जर दुसऱ्या जातीतील व्यक्तिशी विवाह झाला, अगर दुसऱ्या जातीचा दत्तक घेण्यात आला तर तो विवाह व दत्तक हिंदू कायद्याप्रमाणे रद्द समजण्यात येत असे. अशा तऱहेने, हिंदू समाज व कायदा हे दोन्ही जातीवरच अधिष्ठित झालेले आहेत. ज्यास जात नाही असा हिंदूच नाही. ही गोष्ट हिंदू कोड बिलात अमान्य करण्यात आली [आहे. ] हिंदू कोड बिलान्वये जातीचे उच्चाटन व्हावयाचे आहे. नव्या कायद्याने जातीची बंधने नाहिशी होणार असून कोणत्याही जातीत विवाह व [दत्तक ] [होऊ ] [शकेल. ]