१८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दुसरी सुधारणा एकपत्नित्व पाळण्यासंबंधी आहे. प्रचलित व पुरातन हिंदू कायद्याप्रमाणे हिंदूस हव्या तितक्या स्त्रियांशी विवाह करता येतो. अनेक पत्नित्वासंबंधी मुसलमानी कायद्यावर टीका करण्यात येते. परंतु हिंदू कायद्यात व मुसलमानी कायद्यात या बाबतीत बराच फरक आहे. तोहाकी जो पुरुष चारही स्त्रियांना इन्साफ देऊ शकेल म्हणजेच त्यांचे वैवाहिक जीवन सुखाने सांभाळू शकेल, त्यासच ४ स्त्रियांशी विवाह करता येईल, अशी अट हिंदू कायद्यात नाही.
हिदू कायद्याप्रमाणे एका पुरूषाला अनेक स्त्रियांशी लग्न करण्याचे केवळ तात्त्विक स्वातंत्रय आहे असे नव्हे. त्याची प्रत्यक्षात अनेक उदाहरणे आहेत. बंगालमध्ये कुलीन विवाह पद्धती म्हणून एक पद्धत आहे. त्या पद्धतीप्रमाणे एका माणसाने ५०० स्त्रियांशी लग्ने केली तरी चालतात. असेच एका बंगाल्याने ५०० बायका केल्या होत्या. पंढरपूरच्या यात्रेच्या वेळी एखादा पंड्या जसा यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंची नावे-गावे एका रजिस्टरात नोंदतो त्याप्रमाणे या बंगाली माणसाने आपल्या बायकांची नावे, वय व पत्ता एका रजिस्टरात नोंदून ठेवली होती. त्याच्या बायका ठिकठिकाणी गावोगावी असत. ' नवरा-बायको ' म्हणून त्यांचा संबंध नसे आणि तसे त्याचेवर बंधनही नव्हते त्यामुळे तो बंगाली नवरा दर गावी जाऊन आपली बायको धुंडाळी आणि वर दक्षिणाही घेई. ही आमची बहुपत्नित्वाची चाल इतकी भयंकर दयाशून्य आहे. हिंदू-कोड-बिलाचे रूपांतर कायद्यात झाल्यावर ही पद्धती बंद करण्यात येणार आहे. नवीन कायद्याप्रमाणे एका हिंदूस फक्त एक बायको करता येइल.
तिसरी सुधारणा घटस्फोटासंबंधी आहे. सध्याच्या कायद्याप्रमाणे बायको ही नवऱ्याची अर्धांगी समजली जाते. एकदा. लग्न केले की तिला कोणत्याही कारणास्तव विभक्त होता येत नाही की काडीमोड घेता येत नाही. हिंदू कायद्याप्रमाणे विवाहाच्या गाठी न सुटणाऱ्या मानल्या जातात. खरे म्हणजे, ज्या स्त्रीचे नवऱ्याशी अगर ज्या नवऱ्याचे स्त्रीशी पटत नाही त्यांना एकत्रित ठेवण्याची सक्ती करणे केव्हाही रास्त नाही. तेव्हा काही ठराविक अटींवर नवरा-बायकोस काडीमोड मिळण्याची सवलत हिंदू कोड बिलात ठेवण्यात आली आहे.
चवथ्या सुधारणे अन्वये हिंदू कायद्यातील ' कोपारसिनरी ' पद्धती नष्ट करण्यात आली आहे. पूर्वजाकडून जी इस्टेट चालत येते त्यावरील वंशजाच्या हक्कासंबंधी सध्या दोन पद्धती रूढ आहेत. एक मिताक्षरा व दुसरी दायभाग. मिताक्षरा ही बंगालखेरीज सर्व प्रांतात चालू असून त्या पद्धतीनुसार