११-१-१९५० हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरणे केले पाहिजे - Page 219

हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे १८१

बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व मुलाना जन्मसिद्ध हक्क म्हणून वाडवडिलांची संपत्ती मिळू शकते. ती विकावयाची असल्यास त्या मुलांच्या संमतीची जरूरी असते. त्या पद्धतीला प्रतिबंधदाय असेही म्हणतात. दायभाग ही पद्धती बंगाल प्रांत व आजूबाजूचा काही भाग या ठिकाणी आहे. या पद्धतीमध्ये मुलांना अशाप्रकारचा कोणताही वारसा हक्क नसून बापाच्या मृत्यूनंतरच मुलाचा वडिलाजित संपत्तीवर अधिकार येतो. याशिवाय तिसरीही एक पद्धत आहे ती म्हणजे वारसा हक्काचा कायदा ("६ (4५7 0590006950). परंतु तो हिंदुना लागू नाही. तेव्हा, नव्या बिलात मिताक्षरा पद्धत रद्द करण्यात आली असून ' दायभाग ' ही पद्धत सर्वत्र रूढ करण्यात येणार आहे. यामुळे सर्वत्र सुसंबद्धता येईल आणि इस्टेटीचा योग-विनियोग करण्यास बाप मोकळा राहील. त्यामुळे संपन्नता वाढण्यास व आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

पाचवी व शेवटची सुधारणा स्त्रियांना इस्टेटीत मिळणाऱ्या हक्कासंबंधी आहे. आज स्त्रियांना संपत्तीत संपूर्ण मालकी गाजविता येत नाही. तिला बक्षीस म्हणून लग्नाच्या वेळी जी रक्‍कम किंवा दागिने मिळतात तेच तिचे धन म्हणून समजले जाते. मुलीच्या हक्कासंबंधीचा भेदाभेद काढून टाकण्यात येणार आहे. बापाच्या मिळकतीत मुलाप्रमाणे मुलीनाही यापुढे योग्य तो वाटा मिळत जाईल. म्हणजे मुलगा-मुलगी असा भेद हा कायदा जाणणार नाही. स्त्रीला समान वाटा मिळेल. आतापर्यंत ही योजना नव्हती. १९३७ पूर्वी तर विधवांनासुद्धा आपल्या पतीच्या मिळकतीवर हक्क सांगता येत नव्हता. १९३७ साली त्यासाठी एक नवा कायदा करण्यात आला. परंतु या कायद्यात मर्यादित मालकी व मुलींचा समान वारसा हक्क मान्य करण्यात आला नव्हता. या नव्या हिंदू कायद्यान्वये हे दोन दोष काढून टाकण्यात आले आहेत.

या सर्व विवेचनाकडे पाहिले की, एक गोष्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात येइल, ती ही की सुधारणा कशी करावी अगर कोणत्या प्रकारची करावी याबद्दल मतभेद असणे शक्य आहे. परंतु सुधारणा नको असे मुळीच म्हणता यावयाचे नाही.

या सुधारणेकडे पाहाण्याचे तीन दृष्टिकोन संभवतात. त्या दृष्टोवरच तुमचा विरोध कशा प्रकारचा आहे हे कळून येईल. एक म्हणजे बुद्धिवादी दृष्टिकोनातून या सुधारणांकडे पाहाता येईल. दुसरे म्हणजे तौलनिक अभ्यास करून या सुधारणांकडे पाहाता येईल आणि तिसरा दृष्टिकोन सनातन्यांचा येईल. पहिल्या दोन प्रकारचे जे लोक आहेत त्यांचा विरोध असण्यापेक्षा कोणत्या पद्धतीने हे संहतीकरण घडवून आणावे याच्याबाबत मतभेद होतील. परंतु यात अंतर्भूत "असणाऱ्या मूलभूत तत्त्वांना त्याचा विरोध असणार नाही.