११-१-१९५० हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरणे केले पाहिजे - Page 220

१८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सनातन्याचा दृष्टिकोन जीवनात स्वीकारणे शक्‍य आहे काय? आज, जीवनातील सर्व गोष्टीवर राज्यघटनेचे प्रभुत्व पडत आहे. तिला सार्वभौमत्व आहे. मी हे जाहीर करू इच्छितो की, मनूचा अधिकार आता संपला आहे.

आपल्या देशात सनातनी वृत्तीचा प्रभाव जास्त आहे. म्हणून अशा बहुसंख्य समाजाला बरोबर घेऊन जावयाचे असल्यामुळे त्याचीही विचारसरणी मी समजावून घेऊ इच्छितो. परंतु तसे करीत असताना माझ्या मनात एक प्रश्‍न येतो की, या नव्या हिंदू कोड बिलात ज्या सुधारणा आहेत त्यांना आपल्या जुन्या धर्मशास्त्राचा आधार नाहीच काय ? मी काही संस्कृत तज्ज्ञ नाही. हिंदू कायद्याचा पंडितही नाही. परंतु थोडासा मी हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यावरून मला आपल्याला कोणत्या ना कोणत्या शास्त्रातील काही आधार

देता येतील.

(१) सध्याचा हिंदू कायदा जात मानतो. ही जात आईप्रमाणे मानली जाते. कारण हा कायदा ' मातृसावर्ण्य ' मानतो. हा मातृसवर्णाचा नियम विश्वव्यापी आहे का ? आदिकाळापासून हा नियम चालत आला आहे का ? कीमातृसवर्णाचा नियम नवीन आहे ? नवीन असला तर जुना नियम काय होता ? हे प्रश्‍न आपण पाहिले पाहिजे.

आज जातीचा प्रश्‍न येतो तसा प्राचीन काळीही येत होता. जन्मलेल्या

मुलाची जात बापाच्या जातीवरून ठरवावयाची की आईच्या ? याबद्दल मनुस्मृतीत अवांतर वर्णाची एक पद्धती सांगितलेली आहे. बाप ब्राह्मण असला व आई क्षत्रिय असली तर मुलाची जात ब्राह्मण मानावी पण बाप ब्राह्मण आहे व आई वैश्य असेल तर मुलाची जात वैश्य मानावी असा एक संकेत या स्मृतीत सांगितला आहे. पण मनुस्मृतीच्या अगोदरच्या ग्रंथात बापाची जी जात असेल तीच जात राहील, असे सांगणारी उदाहरणे आढळतात. राजवाडे यांच्या राधामाधवविलासचंपूत अशी एक जंत्रीच दिली आहे. क्षत्रिय जातीचा शंतनू व शूद्र जातीची गंगा यांच्यापासून झालेल्या भीष्माला क्षत्रीय मानण्यात येते. कृष्णद्वौपायन हा पराशराचा मुलगा. पराशर हा ब्राह्मण व मत्स्यगंधा ही कृष्णद्वौपायनाची आई जातीने कोळी आहे. पण कृष्णद्वौपायन ब्राह्मण समजण्यात येतो. विश्वामित्र हा क्षत्रिय व मेनका ही अप्सरा त्यांच्यापासून जन्मलेली शकुंतला क्षत्रिय आहे. तर जरत्कारू हा ब्राह्मण व जरत्कारी या नागिणीपासून जन्मलेला आस्त हा ब्राह्मण आहे. बापाची जी जात तीच मुलाला लावण्यात येत असे व आज तीच पद्धत अंगिकारली तर जुन्या रूढीचा भंग कोठे होतो, असा माझा सवाल आहे.