हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे १८५
बिल तयार करावयाचे असते तर यापेक्षा वेगळे झाले असते. सध्याचे हे बिल म्हणजे उत्कृष्ट मध्यम मार्ग आहे. मला सर्वाना घेऊन बरोबर जावयाचे आहे. म्हणून या गोष्टीचा सर्वांनी विचार करावा.
आम्हाला दुसराही एक प्रश्न विचारला जातो की आम्ही हिंदुना त्रास देण्यासाठी हे बिल करीत आहोत. हिंदू शास्त्रात चुका आहेत, दोष आहेत पण ते तसेच राहू द्या. तुम्ही हस्तक्षेप कशाला करता ? हिंदू दुबळे आहेत, अहिसावादी आहेत म्हणून आम्ही त्यांना त्रास देतो असे त्यांचे म्हणणे आहे. मुसलमानाच्या धर्मात ढवळाढवळ केली तर ते हिंसात्मक कृत्ये करतील, सरकारविरूद्ध प्रक्षोभ उत्पन्न करतील म्हणून आम्ही त्यांच्या कायद्यात हस्तक्षेप करण्यास भीत आहोत, असा त्यांचा आरोप आहे. हिंदू भुसभुशीत आहेत म्हणून आम्ही त्यांच्या कायद्याचे संहितीकरण करतो आहोत, हे सपशेल खोटे समज आहेत.
आमचे तर असे स्पष्ट मत आहे की, धर्माचा व भौतिक अधिकारांच्या हक्कांचा काही संबंध असू नये. सर्व देशासाठी एक सिव्हिल कोड असावे, असे आम्हालाही वाटते. तशाप्रकारची तरतूद आपल्या राज्यघटनेत आहे व तसे त्यात दिग्दर्शन आहे.
परंतु हे सिव्हिल कोड कसे होणार ? ते स्वर्गातून अवतरेल की परदेशातून आयात करता येइल ? कायदा हा उत्क्रांत व्हावा लागतो. वस्तुस्थितीतून तो बाहेर येतो. म्हणून हिंदू कोड ही नव्या सिव्हिल कोड़ची पहिली पायरी आहे. त्यासाठी आज हिंदुंच्या कायद्याचे संहितीकरण हवे आहे. त्यातून आपणाला ' महत्तम साधारण विभाजक ' काढता येईल. मग आपण मुसलमान इत्यादी अल्पसंख्यांकांकडे जाऊन त्यांना या नव्या सुधारणेची दिशा दाखवू शकू. परंतु माझ्या हातात काही मुद्दे असल्याखेरीज नवे सिव्हील कोड बिल तयार करणे शक्य आहे काय? या गोष्टीचा विरोधकांनी विचार करावा. हिंदुंचा पक्षपात करावा असा यात उद्देश नाही. यात फक्त आपल्या सिव्हिल कोडाला अवश्य ती भूमिका तयार करण्याचा [उद्देश ] [आहे. ]
या बिलात एकान्तिकता नाही. सनातनी मतांना विरोध नाही. फक्त नव्या मतांना, नव्या आचारविचारांना मान्यता दिलेली आहे. ज्याना नवी मते, नवे आचार मान्य नसतील त्यांनी ते पाळावेत असा या बिलाचा आग्रह नाही.