डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १९४
तसे पाहिले तर मी यात विशेष असे काही केले नाही. परंतु या कार्यामुळे एक गोष्ट मात्र सबंध हिंदू जनतेला पूर्णपणे पटली आहे. गेली २० वर्षेपर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते. मी व माझा पक्ष डराष्ट्रीय आहे, इंग्रजांचा साथीदार आहे, मुसलमानांचा बगलबच्चा आहे अशा प्रकारचे धादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते. त्या लोकांची आता आम्ही तसे काही करीत नाही ही खात्री पटली, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली. २० वर्षे आमच्या पक्षास जो कलंक लागला होता तो आता साफ धुतला गेला आहे आणि शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन हा एक सुसंघटित मजबूत राजकीय रूप धारण करणारा, पण राष्ट्रद्रोही कृत्यात कधीही सामील न होणारा पक्ष आहे, ही
सर्वाची पूर्ण खात्री झाली.
आजच्या राजकारणात मी आता विशेष जाऊ इच्छित नाही. परंतु काही गोष्टी अवश्य सांगाव्याशा वाटतात.
पूर्वी आपले राजकारण शत्रुत्वाच्या पायावर चाललेले होते. काँग्रेसवाले आपल्याला व आपण काँग्रेसवाल्यांना शत्रुप्रमाणे मानत होतो. माझ्या दृष्टीने, पूर्वीचे अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोडाशा संकुचित दृष्टिकोनाने पाहात होते व तसेच वागत होते. मीही या दोषाला थोडाबहुत पात्र होतोच. आमचे काय होईल, हिंदुंच्या हाती राजसत्ता आली तर काय होईल, असे आम्हाला वाटत होते. पण हा राजकारणाचा रोख आता बदललाच पाहिजे.
आता आपण एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की आपण आपल्या लोकांचे, आपल्या समाजाचे हित पाहात होतो ते तर पुढे चालू ठेवलेच पाहिजे ; परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल त्याचाही विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पारतंत्र्यात पिचत पडावे लागले आहे. अगोदर मुसलमानांनी व नंतर इंग्रजानी आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतले होते. स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जितकी जरूरी आहे तितकीच खालच्या वर्गालाही आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आहोत. पण आता पुन्हा परकियांच्या गुलामगिरीत पडण्याचा प्रसंग आपल्यावर आला तर ती गोष्ट अत्यंत दुर्दैवाची ठरेल. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हेही प्रत्येकाने आपले परम कर्तव्य मानले पाहिजे.