परकियांच्या गुलामगिरीचा . . . . तर तो आत्मनाश ठरेल १९५
या देशात इंग्रज लोक राज्य करीत होते त्यावेळी कोणाला काय हक्क द्यावयाचे, कोणत्या पक्षाला केव्हा अधिकार द्यावयाचा हे त्यांच्या हातात होते. त्यावेळी आपण इतर पक्षांशी फटकून वागलो. पण आता इंग्रज नाहीसे झाले आहेत. तेव्हा आपण इतर पक्षांशी सहानुभूतीने वागण्याचे-धोरण ठेवले पाहिजे व त्यांच्याबरोबर तहनामा-वाटाघाटी वगैरे प्रकारांनी संबंध राखले पाहिजे. आपण अल्पसंख्य आहोत आणि राज्यघटनेत आपल्याला काही जागा मिळाल्या, काही नोकऱ्या मिळाल्या तरी आपण अल्पसंख्यांकच राहाणार आहोत. तेव्हा सनदशीर मार्गानी आपणास जर उन्नती करून घ्यावयाची असेल तर कुणा ना कुणा पक्षाशी, अथवा वर्गाशी संगनमत करूनच आपणाला वागले पाहिजे. अर्थात-पूर्वीचे शत्रुत्व व वैर आता विसरले पाहिजे. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखले पाहिजे आणि आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वीसारखा एकलकोंडेपणा आता उपयोगी पडण्यासारखा
नाही. |
कोणत्याही पक्षाशी सहमत होताना, मग तो पक्ष काँग्रेस असो, सोशालिस्ट असो अथवा शेतकरी कामगार पक्ष असो आपण आपली संघटना मोडता कामा नये. व्यक्तिगतदृष्ट्या माणसाला किंमत नसते. आज मला काँग्रेस गटात व राजकारणात जो मान आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या मागे शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनची संघटना आहे, हेच होय. ज्या दिवशी या संस्थेचा आधार नाहिसा होईल त्या दिवशी राजकारणात मला किंमत उरणार नाही. म्हणून देशरक्षणाची भावना मनात बाळगून भावी राजकारणातील शत्रुमित्रांचे नाते ओळखून, स्वत्व राखून आपण सावधतेने शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या नेतृत्वाखाली पावले टाकली पाहिजेत.
देशातील राजकीय पक्षांचे भवितव्य काय आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही. निवडणुका होईपर्यंत राजकारणाला काय स्वरूप येईल हे निश्चित सांगता येत नाही. निवडणुकी या पैशाच्या जोरावर लढविल्या जातात. आतापर्यंत शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनने जे राजकारण केले त्यात पैशाचा संबंध आला नव्हता. या पक्षातील लोक मुळातच दरिद्री असल्याने मोठा निधी जमण्याची आशाही नव्हती. परंतु आता या पक्षातील व आपल्या जमातीतील प्रत्येक स्त्री-पुरुषाने कमीत कमी चार आणे देऊन एक निवडणूक निधी उभारला पाहिजे. दलित फेडरेशनने निधी जमविण्याची चळवळ आता हाती घेतली पाहिजे. ऑल इंडिया दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिंटीत तसा ठरावही पास झाला आहे. तेव्हा स्वयंसेवकांनी त्यासाठी घराघरातून फिरले पाहिजे. बंधु-भगिनींनो, आपण माझा गौरव केलात त्याबद्दल पुन्हा एकवार आपले आभार मानून रजा घेतो.