२०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तुम्हीही विचार करा की जो धर्म मानव जातीच्या कल्याणासाठी साह्यकारी होऊ शकतो, ज्यात मानवाच्या मुक्तीचे द्वार खुले आहे, आणि ज्यात मानवामानवात भेदभाव नसून समता आहे तो धर्म, धर्म या संज्ञेला पात्र ठरू शकतो. ज्या धर्माचे मूलतत्त्व मानवामानवात भेद निर्माण करणे हेच आहे तो धर्म ' सद्धम्म ' म्हणण्याच्या लायकीचा नाही. ब्राह्माण धर्माने मानव समाजात भेदाच्या दऱ्या निर्माण केल्या. त्याने स्त्रियांच्या व शूद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवण दिली. भगवान बुद्धाच्या धर्माचा प्रधान हेतू मानवी-समता हा आहे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याचे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य या धर्मात आहे. हिंसेचा उच्छेद आणि अहिंसेचे प्रस्थापन हे त्याचे एक प्रमुख अंग आहे. कोणत्याही प्राण्याची एखाद्या देवतेच्या नावावर हिंसा करणे किंवा त्याचा बळी देणे आणि पुन्हा निर्लज्जपणे असे प्रतिपादन करणे की 'त्याला स्वर्ग मिळाला,' असे बौद्ध धर्माने सांगितले नाही.
बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोनही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत, असे मला म्हणावयाचे आहे. बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ज्ञांना हे माहीत आहे की बौद्धधर्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध काळाचीच देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ. पू. २७४ पर्यंत बौद्धधर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्धधर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी नानाप्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व -तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता.
प्रश्न असा निर्माण होतो की, जो धर्म इतका श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला ? या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक