६-६-१९५० बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केली - Page 250

२१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कानून तयार करीत होते. परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खूप मोठी हानी झाली तेव्हा राज्य शासन न चालविण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करून ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नाला लागले. अशातऱहेच्या अगणित घटना भारतीय वाङ्मयात सापडतात. काही ठिकाणी असेही आढळून येते की जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते, तेथे त्यांना धार्जिणे असलेल्या क्षत्रियांना हाताशी धरून किंवा त्यांना समोर करून म्हणजे त्याला आपल्या हातातील बाहुले बनवून राज्यकारभार ते करीत असत. अशाप्रकारे पुन्हा ब्राह्मणवादाने जोर पकडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला आणि भारतातून त्याचा लोप होण्यास तो कारणीभूत ठरला,

ब्राह्मणी शासनाधिकाराची एक फार मोठी घटना मौर्य साम्राज्याचे परिवर्तन घडून येण्यामध्ये दिसून येते. भारतीय इतिहासकारांनी या महान घटनेला महत्त्व दिले नाही, ही फार दुःखाची गोष्ट आहे. वस्तुतः ही भारतीय इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. अंतिम मौर्य सम्राट महाराज बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. याचा गुरू पतंजली हा होय. पतंजलीने योगविद्या बौद्धांपासूनच मिळविली होती ; परंतु नंतर हा बौद्धांचा शत्रु बनला. याच्या सल्ल्यानुसार सेनापती शुङ्गवंशीय पुष्यमित्राने बृहद्रथाला ठार मारले व मौर्यवंशाच्या बदलीत आपल्या शुङ्गवंशाच्या नावाने ब्राह्मणी राज्य चालविले.

या ब्राह्मणी राज्याने बौद्ध धर्माला अपरिमित नुकसान पोहोचविले. ब्राह्मणी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यातील हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्माचा भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरलेली ही फार मोठी ऐतिहासिक घटना होय.

भारतातून बौद्ध धर्माचा लोप होण्यास विदेशी आक्रमणेही कारणीभूत ठरली, असे मानण्यात येते. परंतु युनानी लोकांच्या आक्रमणांमुळे बौद्ध धर्माला झळ पोहोचली नाही. याउलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी द्रव्य सहाय्य केल्याचेही पुरावे इतिहासात आढळतात. गुप्तकाळात भारतावर हूणांची आक्रमणे झाली परंतु गुप्त राजांकडून पराभूत झाल्यामुळे ते भारतातच स्थायिक झाले. यांच्याकडूनही बौद्ध धर्माला झळ पोहोचली नाही. याउलट पेशावर येथील शक राजा कनिष्क याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याने तक्षशिला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले होते आणि बौद्धांची चौथी धर्म-संगीती (धर्मसभा) भरविली होती. या धर्मसंगीतीतच महायान मार्गाचा