२२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कोर्टातील भाषा कोणती राहावी याच्या विचाराने माझे मन व्यग्र होते. काही लोक म्हणतात कोर्टाची भाषा हिंदी राहावी; तर काहींच्या मते ती इंग्रजी, राहावी. स्थानिक भाषातून कायद्यातील शब्द व्यक्त करता येत नाहीत, असा अनुभव आहे. उदाहरणार्थ इक्विटीला योग्य असा शब्द नाही. याकरिता स्थानिक भाषा कोर्ट भाषा होणे सर्वानाच फायदेशीर होणार नाही. त्यामुळे राज्यकारभारात कितीतरी अडचणी उदूभवतील. अर्थात राष्ट्रीय भाषा कार्यक्षम झाल्यावर तिला तिचे योग्य स्थान मिळेलच.
मला वकिलीचा धंदा फार आवडतो. पण या धंद्याविषयी लोकात आदर नाही. भारतात वकिलावर कित्येक आरोप केले जातात. मध्यवर्ती सरकारातून मुक्तता झाल्यावर मी वकिलीलाच वाहून घेणार आहे. आज या देशात लायक असे वकील थोडेच आहेत आणि लायक वकील नसतील तर खात्याची अधोगती होईल. आज या धंद्याला अवनत कळा आली आहे. याचे एक कारण म्हणजे या धंद्यात काम करणारे लोक निवृत्त होऊन तरुण वकिलांना संधी देत नाहीत. अर्थात धंद्याची प्रतिष्ठा राहावी म्हणून तरुण वकिलांना संधी दिली जाणे अवश्य आहे.
यानंतर या धंद्यात काही झाले तरी नीतीमत्ता राखली पाहिजे असे सांगून, त्यांनी कायदे पंडितांनी स्वातंत्र्य, हेबीअस कॉर्पस व इतर कामकाजाचे महत्त्व ओळखून राष्ट्राची सेवा करावी अशी सूचना केली.