१४-१-१९५१ बौद्ध धर्म हा पुन्हा या देशाचा धर्म होईल - Page 268

२२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

होतात हे मला चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. मी आपणापुढे बोलण्यासाठी कसलीही पूर्व तयारी करून आलो नाही.

शतकानुशतके धर्माचा दिवस मानायचा झाला तर तो कोणता मानावा ? तर असे वाटेल की शिवरात्र मानावी. राम जयन्ती वा कृष्ण जयन्ती मानावी. हिंदू धर्माच्या संस्कृतीने नियोजित केलेल्या दिवसाशिवाय दुसरा दिवस आमच्या मनात येत नाही. बुद्धाचा दिवस मानावा ही भावना कोणाच्याही मनात येत नाही ! आश्‍चर्य आहे! असे का व्हावे, याचे कारण समजत नाही.

बुद्ध या देशात ८० वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची ४५ वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्या जवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश कल्याणाकरिता तो जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पायी फिरला. १२०० वर्षापर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.

केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खऱ्याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वानी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आणि आज ती वेळ आली आहे. १२०० वर्षांचा धर्म पुनरपि या. देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे. (प्रचंड टाळया)

हिंदू धर्म एका नाल्यासारखा आहे. दोन नाल्यांचा मिळून संगम होतो व त्याचां तिसरा नाला बनतो. तसा हिंदू धर्म त्या नाल्यासारखा झाला आहे. एका. नाल्यातले पाणी स्वच्छ असते व दुसऱयातील घाणेरडे असते. या दोहोंचा संगम घाणेरडा, तसेच हिंदू धर्माच्या नाल्यात दोन तऱ्हेचे पाणी वाहून आले आहे. स्वच्छ असा बौद्ध धर्माचा नाला आणि ब्राह्मणी धर्माचा गलिच्छ नाला. या दोहोंच्या संगमामुळे हिंदू धर्माचा नाला घाणेरडा झाला आहे. त्यातील घाणेरडे आणि स्वच्छ पाणी निराळे केले पाहिजे. तरच घाण साफ करता

येईल.

येथील भिक्षुमित्राने सांगितले की, पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी आणि माझे लोक मिळून आम्ही काही नियम करणार आहोत. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध हे चालणार नाही.