बौद्ध धर्म हा पुन्हा या देशाचा धर्म होईल २२९
शिवाय ज्या हिंदुलोकांना बौद्ध दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मुळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही.
ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे व बौद्ध धर्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईंची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धर्मच पाळा इतर काही नाही.
हल्ली धर्माला ग्लानी आली आहे. पण मी म्हणतो की धर्माची सर्वानाच आवश्यकता आहे. माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे. धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धर्मच पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्धाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील. मी आज २० वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्व धर्माचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्मच स्वीकारायला पाहिजे, असे माझे मत झाले आहे.
विचार करा! हा देश एका काळी सुसंस्कृत झाला होता म्हणून सांगतात. मग ५ कोटी अस्पृश्य त्यात कसे निपजले ? जवळ जवळ ५/७ कोटी लोकांना चोऱ्यामाऱ्या करण्याव्यतिरिक्त दुसरा जीवनमार्ग नसावा, हे कसे झाले ? अस्पृश्यता सांगणारा जगात एकही धर्म नाही. त्या काळच्या व आजच्या सुसंस्कृत पुढाऱ्यांनी प्रयत्न का केला नाही. चोऱ्यामाऱ्या करून जगणारी जात ज्या संस्कृतीत पैदा होते तिला सुसंस्कूती म्हणता येईल काय ? असल्या जमातींना सुधारण्याचा लोकांनी प्रयत्न केला नाही त्याअर्थी . तीत काही तरी वैगुण्य निश्चित आहे. या हिंदू धर्मात ५ कोटी अस्पृश्य आणि ५-१० कोटी लोक चोऱ्यामाऱ्या करणारे का आहेत? कारण या धर्मात दोष
आहेत.
हे नवीन कार्य पारखून बघा, त्याचा अभ्यास करा; त्यात सामील व्हा ! या सुमंगल कार्यात आपण सामील झालात म्हणून मी तुमचे अभिनंदन करतो.