२७७
अस्पृश्य समाजावर होणाऱ्या जुलूमांना
दलित प्रतिनिधींनी वाचा फोडली पाहिजे
भारत सरकारचे कायदेमंत्री आणि दलित वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रविवार दिनांक १५ एप्रिल १९५१ रोजी संध्याकाळी दिल्ली येथे म्युटिनी रोडवरील आंबेडकर भवनाच्या पायाचा दगड बसविला. या कार्यक्रमाचे दळणवळण मंत्री श्री. रफी अहमद किडवाई अध्यक्ष होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
ब्रिटिश राजवटीत दलित वर्गाला जेवढे संरक्षण होते तेवढे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय सरकारच्या कारकीर्दीत नाही, असे मला दुःखाने म्हणावे लागत आहे. ब्रिटिश राजवटीत नोकऱ्यात दलित वर्गाला बारा टक्के प्रतिनिधीत्व देण्याच्या ठरावाची पूर्ण अंमलबजावणी होत होती: पण आता त्या ठरावाला कागदाच्या साध्या कपट्याएवढी किंमत उरली आहे
लोक म्हणतात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण दलित वर्गाला स्वातंत्र्य मिळाल्याचे मानायला मी तयार नाही
पंजाबमध्ये आमच्या लोकांवर वाईटात वाईट जुलूम होत आहे. अशा जुलूमाने गांजलेले चाळीस लोक दिल्लीला आले आणि त्यांनी राजघाटावर प्राणांतिक उपास आरंभला. दिल्लीच्या वर्तमानपत्रांनी या बातमीवर संपूर्ण बहिष्कार टाकला. या लोकांनी सुमारे तीस दिवस उपास केला; पण आपल्याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याचे पाहून त्यांना परत फिरावे लागले. माझी खात्री आहे की, जी वर्तमानपत्रे यावेळी मूग गिळून बसली होती त्यांनीच दिल्लीमध्ये एखाद्या म्हाताऱ्या बाईने जर उपास केला असता तर ती बातमी मोठमोठे मथळे देऊन प्रसिद्ध केली असती. वर्तमानपत्रे अस्पृश्यांची दखल घेत नाहीत.
पंजाबमध्ये शिखांनी आणि इतरांनी अस्पृश्य स्त्रियांना पळविल्याच्या बातम्या आहेत. दलित वर्गाच्या लोकांवर अनेक प्रकारचे जुलूम करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात त्यांना ' शामलात ' जमिनी विधी करू देण्यात येत नाहीत, लाकडे तोडू देण्यात येत नाही.
जनता : २१ एप्रिल १९५१.