अस्पृश्य समाजावर होणाऱ्या . . . . वाचा फोडली पाहिजे २३१
दलित वर्गाचे. प्रतिनिधीत्व करण्याची ज्यांच्याकडून अपेक्षा करावी असे दहा सभासद पंजाबच्या विधिमंडळात आहेत. लोकसभेत गेली दोन वर्षे माझ्यासमोर असे तीस सभासद बसत असतात. त्यांच्यापैकी कोणालाही मी दलित वर्गाच्या कल्याणाबद्दल किंवा त्या वर्गावर होणाऱ्या जुलूमाविरूद्ध एकही प्रश्न विचारताना पाहिलेले नाही. लोकसभेत सध्या अंदाजपत्रकावर चर्चा चालू आहे. अन्न, चलनवाढ, कापडाची आणि साखरेची टंचाई याबद्दल सरकारवर टीका करण्याची संधी कोणी दवडत नाही. पण पंजाबमध्ये अस्पृश्य समाजावर जो जुलूम होत आहे त्याबाबतीत काय करीत आहा? असा प्रश्न कोणीही विचारलेला नाही.
असे हजार जरी सभासद लोकसभेत असले तरी दलित वर्गाचा काय फायदा होणार आहे ? हे मुके लोक काय करू शकणार. आहेत ? मी एक मंत्री असल्यामुळे माझ्या तोंडाला कुलूप लागले आहे. मी सरकारात नव्हतो तेव्हा जुलूमाविरुद्ध-जबरदस्तीविरुद्ध आवाज उठवीत असे. त्यावेळी मी कोणताही अन्याय सरकारच्या नजरेस आणू शकत असे. आता माझ्या तोंडाला कुलूप बसले आहे आणि ज्या सभासदांकडून दलित वर्गाचे मन बोलून दाखविण्याची अपेक्षा करावी ते सुद्धा गप्प बसतात.
देशाच्या निरनिराळ्या भागातून दलित वर्गाचे हजारो लोक दिल्लीला मदत मिळविण्यासाठी येतात आणि यासाठी आंबेडकर भवनात व्यवस्था करण्यात येणार आहे. हे भवन सवर्ण हिंदुंकडून एक कपदिकही न घेता दलित वर्गाने स्वत:च्याच
हिंमतीवर उभारावयास पाहिजे.
गांधीजींनी अस्पृश्योद्धाराची चळवळ हाती घेतल्यापासून सवर्ण हिंदुंच्या दृष्टिकोनात फरक पडला आहे हे मला मान्य आहे. पण पं. शर्मा यांच्यासारख्या मित्राची सहानुभूती जरी मौल्यवान असली तरी आपल्याला आपल्या ताकतीवरच अवलंबून राहिले पाहिजे. भुकेलेल्या माणसाला भाकरी हवी असते, नुसती सहानुभूती नको असते. आपण जर एकजुटीने उभे राहिलो तर आपल्या हितचिंतकांच्या मदतीने आणि सहकार्याने आपण आपली परिस्थिती
सुधारू शकू.