२७८
बुद्धाने वर्णाश्रम धर्म नाकारला
दिल्ली शेड्यूल्ड कास्ट्स् वेलफेअर असोसिएशन आणि भारतीय महाबोधी
सोसायटी यांच्या विद्यमाने नवी दिल्ली येथे दिनांक १९, २० व २१ मे १ ९५१ रोजी
' बुद्ध जयंती ' मोठ्या स्वरूपात साजरी झाली.
शनिवार दिनांक १९ रोजी दिल्लीत फार मोठी मिरवणूक निघाली
होती. रिडींग रोड वरील बुद्धमंदिराजवळून मिरवणूक निघून आयर्विन रोड,
कॅनॉट सकल, पुंचकिन रोड वगैरे रस्त्याने जाऊन दिल्ली शेड्यूल्ड कास्ट्स्
वेलफेअर असोसिएशनच्या आंबेडकर भवनाजवळील मैदानात विसर्जन पावली.
रविवार तारीख २० ला एक टोलेजंग सभा झाली. या. सभेचे अध्यक्षस्थान
फ्रान्सचे भारतातील वकिलांच्याकडे होते. या सभेत फिनलँडचे भारतातील
प्रतिनिधी ने. ना. ह्यागो वॉलव्हन, बर्माचे कीन्सल जनरल ने. ना. टिन मॉग गी;
सिलोनचे हायकमिश्नर ने. ना. कुमारस्वामी, नागपूरचे प्रो. कुलकर्णी उपस्थित
होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
अध्यक्ष महाराज, बंधु आणि भगिनींनो,
आपल्याला इथे आल्यास दोन तीन तास झाले असतील आणि साहजिकच
आपल्याला घरी जाण्याची ओढ लागली असेल, हे जाणून मी अधिक वेळ घेणार नाही. तशात माझ्याआधी पाच सहा वक्त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या चरित्रावर बरेचसे सांगितले आहे. मला जे काही सांगावयाचे आहे ते सर्व आजच सांगितले पाहिजे असे नाही. कारण आजच्यानंतर पुन्हा आपण भेटणार नाही, असे काही नाही. आपण पुनःपुनः भेटणार आहोतच. तरीही मी काहीतरी सांगावे असा बहुतेकांचा आग्रह असल्यामुळे थोडेसे का होईना पण बोलले हे पाहिजेच.
माझी अशी इच्छा आहे की, भारतातील साऱ्या अस्पृश्यांनी बुद्धाची शिकवण आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण ठेवायला पाहिजे. गेल्या वर्षी बुद्ध जयंतीकरता आपण इथे गोळा झालो होतो. त्यावेळी इतका मोठा जमाव नव्हता; पण आजचा हा अफाट जनसमुदाय पाहून एक वर्षात लोकांमध्ये एवढी गोडी निर्माण झाली याबद्दल मला समाधान वाटते. शिवाय अस्पृश्यांच्या बातम्यांना विशेष जागा न देणाऱ्या वर्तमानपत्रात कालच्या टोलेजंग मिरवणुकीबद्दलची बातमीही मला वाचायला मिळाली. आपण केलेली प्रगती ही प्रशंसनीय
आहे.
जनता : २६ मे १९५१.