बुद्धाने वर्णाश्रम धर्म नाकारला २३५
हिंदू धर्माचा धिक्कार करण्यास पुरेशी आहे. हिंदू धर्मात आज जिकडेतिकडे ` ढोंग माजून राहिले आहे. ब्राह्मण लोक देवळात राहतात. कारण तेथे त्यांना ऐषआरामी जीवन व्यतीत करायला मिळते म्हणून, देवाची भक्ती करायला नव्हे. गेल्या वर्षी सिलोनवरून परत येताना मी मद्रासला गेलो होतो. त्यावेळी तिथल्या बऱ्याचशा हिंदुंनी मला देवळे पाहाण्याची विनंती केली. मला आश्चर्य वाटले; मी गेलो. मी देवळे हिंडून पाहिली. तिथे हे ब्राह्मण लोक मूर्तिपूजा करायचे आणि धूप कापूर जाळायचे. या पलिकडे दुसरा कसलाच उद्योग करीत नाहीत असे कळले. हा त्यांचा एक महत्त्वाचा उद्योग झाला ! दुसरा उद्योग मला कळला तो हा की त्यांना फार ' भोजन ' खावं लागतं. सकाळचे भोजन, दुपारचे भोजन, संध्याकाळचे भोजन ! या भोजनाचा मात्र फार मोठा उद्योग ते लोक करतात. मी त्यांना विचारले की त्यांचे हे सगळे चालते कसे ? त्यावर मला उत्तर मिळाले की मद्रास सरकारकडून त्यांना दीड लाख रुपयांची वार्षिक ग्रँट मिळते. काही देवळातून सोन्याचांदीच्या मूर्ती आढळल्या. काहींच्या किंमती तर कोटी रुपयांनीच करता येतील. एकीकडे देशात अन्नात्रदशा, लोक पैशाला महाग झाले आहेत आणि दुसरीकडे अन्नाची लयलूट आणि पैशाची खैरात ! आणि हे सर्व हिंदू धर्माच्या या अध्वर्युकरिता ! का नाही हे लोक हिंदू धर्माचा उदोउदो करतील !
धर्म शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. बुद्धाचा वर्णाश्रम पद्धतीवर कधीच विशवास नव्हता. ' आपण सर्व सारखेच आहोत ' ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. माणसा-माणसात कसलाच भेदभाव नाही. जन्माने उच्चनीच कोणीच असू शकत नाही. उच्चनीचता करणीने प्राप्त होते. या गोष्टी बुद्धाने सांगितल्या आहेत. जर लोक पुन्हा बौद्ध धर्माचा अंगीकार करतील
तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहाणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा ; हाच एक उपाय आहे.
परंतु आपण कसलीही घाई न करता हळूहळू आपले साध्य साधू. जुनी माणसे ज्यांच्या हाडीमासी हिंदू धर्म भिनून राहिला अशांना हिंदू धर्म ताबडतोब सोडा, असे आपण म्हटले तर त्यांना ते जमणार नाही आणि मीही त्यांना तसे काही सांगणार नाही, परंतु तरुणांच्याबद्दल मात्र मला दांडगा आत्मविश्वास आहे. योग्य त्या मार्गाने जाऊन आपला, समाजाचा व राष्ट्राचा उत्कर्ष ते खचित
साधतील.
oe ७ ७