१-९-१९५१ आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध - Page 276

२७९
आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर
उच्च शिक्षण हेच औषध

पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्या हस्ते १ सप्टेंबर १९५१ रोजी बसविण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी, डॉ. आंबेडकर अस्पृश्य आणि गोरगरिब समाजात करीत असलेल्या शिक्षण प्रसार प्रचार कार्याबद्दल गौरवोद्गार काढून कौतुक केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ध्येय आणि उद्दीष्टांची त्यांनी प्रशंसा केली. राष्ट्रपतींनी प्रत्यक्ष कोनशिला बसवण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. ते म्हणाले,

अध्यक्ष महाराज,

ज्या कॉलेजची कोनशिला बसविण्याची मी तुम्हाला विनंती करीत आहे ते हे कॉलेज १९ जून १९५० रोजी अस्तित्वात आले आहे. हे कॉलेज सुरू करून त्याचा एकंदर कारभार पाहाणाऱ्यांबद्दल आणि कॉलेज का सुरू करण्यात आले याबद्दल आजच्या प्रसंगी दोन शब्द सांगितले तर ते अनाठायी होणार नाही, असे मला वाटते. ' पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई ' या संस्थेने हे कॉलेज चालविले असून या संस्थेचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. ही सोसायटी १९४५ मध्ये स्थापन करण्यात आली. - साधारणपणे देशभर आणि मुख्यत्वे मागासलेल्या वर्गात उच्च शिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट आहे. याच घ्येयानुसार मुंबईत १९४६ साली ' सिद्धार्थ ' या नावाचे एक कॉलेज उघडण्यात आले; आणि मला सांगायला आनंद वाटतो की, अवघ्या चार वर्षांच्या अवधीत विद्यार्थ्यांची संख्या, देशी विदेशी खेळ आणि शैक्षणिक दर्जा या सर्वच बाबतीत सिद्धार्थ कॉलेजने मुंबई राज्यात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. या कॉलेजमध्ये ८०० विद्यार्थी आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या क्वचितच आढळेल. आंतर कॉलेज खेळांच्या सामन्यात असा एकही प्रकार सापडणार नाही की, ज्यात सिद्धार्थ कॉलेजने विजय मिळविला नाही. मुंबई विश्वविद्यापीठाच्या नामांकित शिष्यवृत्त्या किंवा बक्षिसेही कॉलेजने हातून जाऊ दिलेली नाहीत. सिद्धार्थ कॉलेजच्या.या उज्ज्वल परंपरेबद्दल पीपल्स एज्युकेशन सोसायटीला साहजिकच अभिमान वाटतो.

जनता : १५ आणि २२ सप्टेंबर १९५१.