२३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
उद्देश जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे शैक्षणिक सेवा करणे हा आहे. मुंबईचे सिद्धार्थ कॉलेज चालविण्यात जसे यश मिळाले तशाच प्रकारचे यश या नवीन प्रयत्नातही मिळविण्याची सोसायटीची पहिल्यापासूनच इच्छा होती. मुंबईच्या निष्णात अध्यापकांपैकी काहींना इकडे आणण्यास सोसायटी उत्सुक होती पण असे आढळून आले की, केवळ मराठी बोलणारे प्राध्यापकच स्वेच्छेने येथे येण्यास तयार झाले आणि ह्याच कारणास्तव सोसायटीने औरंगाबादला कॉलेज सुरू केले.
कॉलेजने केलेल्या प्रगतीवरून सोसायटीने औरंगाबादची केलेली निवड योग्य आहे असे म्हणावयास हरकत नाही. कॉलेजच्या प्रगतीची माहिती देण्यापूर्वी सोसायटीच्या गव्हर्नीग बॉडीच्या धोरणाची कल्पना येण्यासाठी कॉलेजच्या काही विशिष्ट गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात.
नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या कॉलेजमध्ये मुलांच्या बरोबरच मुलीही शिक्षण घेत आहेत. सामाजिक मागासलेपणा आणि सहशिक्षणाचा गंधही नसलेल्या या भागात मुलांच्या बरोबरीने मुलींनाही शिक्षण देऊन कॉलेज एक नवीनच पायंडा घालीत आहे. या कॉलेजमध्ये सर्व जातीच्या व धर्माच्या मुली शिक्षण घेत आहेत. मुलींना शिक्षणाला उत्तेजन मिळावे व मोठ्या संख्येने त्यांनी कॉलेजमध्ये यावे म्हणून शहरापासून कॉलेजपर्यंत येण्याकरिता कॉलेजने एक बसही ठेवली आहे. या कॉलेजचे द्वार सर्व धर्मियांना मोकळे आहे. येथे कोठल्याच प्रकारची जातीयता नाही. कॉलेजच्या प्राध्यापक वर्गात सर्व धर्मांचे आणि जातींचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थ्यांत विद्या, विनय आणि शील बनविणे हे कॉलेजचे ध्येय आहे.
अस्पृश्य आणि मागासलेल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे हे कॉलेज खास लक्ष पुरवते. ज्याची चिन्हे आताच आपण पाहात आहोत असा खालचा वर्ग व वरचा वर्ग यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळावयाचा असेल तर सर्व कॉलेजांनी हेच करायला पाहिजे. अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे आणि सध्या कॉलेजमध्ये सव्वीस अस्पृश्य विद्यार्थी असून त्यात विद्यार्थीनीही आहेत.
या कॉलेजच्या एका वर्षातील प्रगतीवरून अशा प्रकारच्या कॉलेजची या भागात असलेली उणीव भरून निघाली आहे, हे सिद्ध होते. १९ जून १९५० रोजी कॉलेज सुरू झाले त्यावेळी फक्त १४० विद्यार्थी होते. आज विद्यार्थ्यांची संख्या ३३२ असून जागेच्या अभावी पहिल्या वर्षाच्या वर्गाकरिता प्रवेश बंद करणे भाग पडले.
हे कॉलेज सर्व साधनांनी युक्त करण्याकरिता सोसायटीच्या गव्हर्नीग बॉडीने कोणतीही संधी दवडली नाही. कॉलेजने १ लक्ष २६ हजार रुपये खर्च करून लेबोरेटरी, सर्व प्रकारची उपकरणे व साधने यांनी सुसज्ज केली आहे आणि तज्ज्ञ डेमॉन्स्ट्रेटरच्या देखरेखीखाली सायन्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः प्रयोग करण्यास संधी मिळते.