२४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आभार मानताना कॉलेजचे प्रिन्सिपाल आणि त्यांचा इतर सहकारी वर्ग यांना मी विसरू शकत नाही. कारण त्यांनी आपली घरेदारे मुंबईत सोडून औरंगाबादला येण्याचा अपूर्व स्वार्थत्याग केलेला आहे.
सध्या कॉलेजमध्ये बी. ए. आणि इंटर सायन्सपर्यंत शिक्षण दिले जाते. परंतु पुढील वर्षी सायन्स डिग्रीपर्यंतचे वर्ग उघडून हे संपूर्ण कॉलेज करण्याचे ठरविले आहे.
सध्या कॉलेज भाड्याच्या बंगल्यात आहे. हे बंगले कॅन्टोनमेंट विभागात असल्यामुळे दोन महिन्यांची नोटीस देऊन खाली करण्यास मिलिटरी केव्हाही सांगू शकेल. ही परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. या परिस्थितीमुळे कॉलेजच्या कायम अस्तित्वाबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. कॉलेजच्या गरजेच्या मानाने सध्याची जागा अगदीच अपुरी पडते. तसेच विद्यार्थ्याकडून होस्टेलची मागणी करण्यात येत आहे. कारण स्थानिक विद्यार्थ्यापेक्षा बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे आणि शहरात इतरत्र राहण्याची पुरेशी सोय नाही. या सर्व कारणांमुळे कॉलेजला स्वतःची इमारत बांधणे अत्यंत जरुरी आहे आणि त्या दृष्टीने सोसायटीने इमारत बांधायला सुरवात केली आहे. या इमारतीत बाराशे विद्यार्थ्यांची सोय होईल एवढे वर्ग, एक सभागृह आणि होस्टेल हे असेल. यासाठी सोसायटीने शहरापासून अडीच मैलाच्या अंतरावर एकशे पंचावन्न एकर जागा खरेदी केली आहे. या जागेच्या भोवतालचे दृश्य रमणीय असून लगतच जीत, पोहण्याची आणि बोटींगची व्यवस्था आहे अशी औरंगाबादेतील सुप्रसिद्ध पाणचक्कीही आहे.
अशा तऱ्हेने हे कॉलेज हैद्राबाद संस्थान आणि औरंगाबाद शहर या दोहोंना ललामभूत करण्याचा सोसायटीचा मानस आहे. तरी पण कॉलेजला अशी स्थिती ' प्राप्त होईल की नाही याबद्दल सोसायटीला चिंता वाटते. कॉलेजच्या या पहिल्याच वर्षाच्या आयुष्यात सोसायटीला १ लाख ७ हजार रुपयांची तूट आली. विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी वाढल्यामुळे या वर्षी ही थोडीशी कमी येईल. तरी पण अशी काही भीतीदायक कारणे आहेत की ज्यामुळे तोटा हा अनिश्चितकाळ येत जाईल आणि कॉलेज चालवण्याचे सोसायटीचे प्रयत्न कदाचित् निष्फळ ठरतील. ती कारणे एवढी गंभीर आहेत आणि अगदीच थोड्या लोकांना त्याची कल्पना असल्यामुळे ती जाहीरपणे प्रकट करावीत असे मला वाटते.
पहिले कारण म्हणजे उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या इंटरपर्यंतच्या कॉलेजचे अस्तित्त्व. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने औरंगाबादला आपले कॉलेज